पारोळ : वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामधील विविध पदासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखती आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आल्या. गुरुवार व शुक्रवारी असणारी ही प्रक्रीया ऐनवेळी रद्द केल्याचे घोषीत झाल्याने राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची मोठी निराशा झाली.राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेने आरोग्य विभागात विविध पदांसाठी १७० रिक्त जागा भरण्याचे ठरविले आहे. यासाठी उमदेवारांकडून अर्ज देखील मागवले होते. आरोग्य विभागासह पालिकेने आणखी ३ माता बालसंगोपन केंद्र, २ आरोग्य केंद्र तसेच ट्रॉमा केअर सेंटर प्रस्तावित केले असून त्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. यामुळे पालिकेने जाहिराती देऊन अर्ज मागवले होते.यामध्ये वैद्यकीय अधिकरी, आरोग्य सेविका, परिचारिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रसाहाय्यक या सर्वांचा या पदांमध्ये समावेश आहे. यासाठीच्या मुलाखती १० आणि ११ मे रोजी करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पालिकेने आपल्या सांकेतिक स्थळावर देखील जाहीर केले होते. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणूक २६ एप्रिल रोजी जाहीर झाल्याने या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ही माहिती पालिकेने ८ मे रोजी जाहीर केली. परंतु विविध जिल्ह्यातून आलेल्या उमेदवारांना ही माहिती नसल्याने शेकडो उमेदवार गुरुवारी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या दालनात येऊन धडकले. या मुलाखतीसाठी लातूर, परभणी, बीड या सारख्या विविध जिल्ह्यातून उमेदवार आले होते. या सर्वांची यावेळी मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. दरम्यान, आचारसंहिता लागण्याने मुलखाती रद्द करण्यासाठी निवडणूक अधिकाºयांची परवानगी घ्यावी लागते. या परवानगीच्या प्रक्रि येमध्ये उशीर झाल्याने उमेदवारांना दोन दिवस आधी सांगण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
आचारसंहितेमुळे शेकडो मुलाखती रद्द, राज्यभरातून आलेल्या शेकडो उमेदवारांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:20 AM