वसई : स्वस्तात म्हाडाची घरे विकत घेऊन देतो असे आमिष दाखवून बंटी-बबलीने नालासोपा-यातील तीनशेहून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे.नालासोपारा पूर्वेकडील रश्मी रिजेन्सीमधील आशिता फायनान्स व आशिता कौशल्या विभाग कुमारस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंतप्रधान कौशल्य योजनेतून व्यवसाय आणि घरासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे तीनशे महिलांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याची आल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुमन रौतेला व सुरजित रौतेला असे गंडा घातलेल्या नवरा-बायकोची नावे आहेत.घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून रौतेला पती-पत्नींनी या महिलांकडून ५० हजार ते ८५ हजार रुपये घेतले आहेत. वर्ष उलटून गेल्यानंतरही घर मिळाले नाही व पैसेही परत मिळत नसल्याने महिलांनी तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. घर विकत घेऊन देण्यासाठी पत्नी सुमनने पैसे घेतल्याची पोलीस ठाण्यात कबुली दिली. मात्र, पाटील नावाचा इसमाने आमची फसवणुक पैसे लुबाडून पळून गेल्याने आम्ही संकटात सापडले. असे सुरजित रौतेला याने पोलीस ठाण्यात सांगितले. प्रत्येकाचे पैसे परत करू असेही सुरजित यांने सांगितले. पण, आपली फसवणुक झाल्याने तक्रार दाखल करा असा आग्रह महिलांनी धरला. पण, तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे फसवणुक झालेल्या हेलन नाडर या महिलेने थेट पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांना मोबाईलवर मॅसेज पाठवून घटनाक्रम कथन केला. या प्रकरणात तथ्ये शोधल्यानंतर कारवाई करतो, अशी ग्वाही देत सिंगे यांनी याप्रकरणातही कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान, यावेळी महिलांच्या तक्रारीचे शुटींग करीत असलेल्या पत्रकारांना पोलिसांकडून धमकवण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पत्रकारांनी या घटनेचा निषेध केला आहे.
घरे देण्याच्या नावाखाली शेकडोंना गंडविले, नालासोपा-यातील बंटी-बबलीविरोधात महिलांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:24 AM