नालासोपारा : अर्नाळ्यातील जेट्टीचे काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीची छेडछाड आरोपीने केल्याने जाब विचारणाऱ्या पतीला चार आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली होती. त्याला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.अर्नाळा येथे जेट्टीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी काही कामगार आपल्या परिवारासह राहतात. भरत गोविंद दिवे (४०) हे आपली पत्नी कुसुमसह जेट्टीच्या येथील मनोहर राऊत यांच्या घरासमोर रविवारी रात्री झोपले होते. दारूच्या नशेत आलेल्या चार आरोपींनी भरत यांच्या पत्नीची छेडछाड केली. पत्नीने आरडाओरडा केल्यावर सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पतीने याबाबत चौघांना विचारणा केली. आरोपी ब्लेस तपेली, मोशे व त्यांच्या दोन मित्रांनी भरत यांना लाथाबुक्क्यांनी तसेच विटेने मारून गंभीर दुखापत केली. पत्नीची छेडछाड केल्याने पतीने जाब विचारल्यावर आरोपींनी मारहाण केल्याने गंभीर मुका मार लागला होता. दिवसभर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी न जाता संध्याकाळी त्रास झाल्यावर घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये नेले. संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याने हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.- चंद्रकांत जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग
छेडछाडीचा जाब विचारल्याने पतीची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 1:31 AM