जव्हार : पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये पिंपळशेतपैकी खरोंडा या गावात गरिबीला कंटाळून रुक्षणा जीवल हांडवा या महिलेने आपल्या दोन मुलींना विष पाजले. यात आईसह एका मुलीचा मृत्यू झाला तर एक मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. रुक्षणा हिला एकूण ४ मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित मंगळवारी जव्हारमध्ये दाखल झाले. या घटनेतून सुदैवाने बचावलेल्या आणि जव्हार कुटीर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृषाली (८ महिने) हिच्या प्रकृतीची विचारपूस पंडित यांनी केली. त्यानंतर या कुटुंबाच्या गावालाही पंडित यांनी भेट दिली.
ही घटना हृदयद्रावक असून मी या घटनेने प्रचंड अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रि या यावेळी विवेक पंडित यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आपल्याशी याबाबत चर्चा केल्याचे ते म्हणाले. मातृछत्र हरपलेल्या या तीनही बालिकांना वयाच्या अठरा वर्षापर्यंतच्या मुदतीच्या प्रत्येकी दोन दोन लाखाच्या मुदत ठेवी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक स्तरावर घोषित केल्या.जूनमध्ये रुक्षणा यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर या कुटुंबाची परवड सुरू झाली. पतीच्या निधनानंतर रुक्षणा यांचा आधारच गेला होता. पाचवीला असलेले दारिद्रय, लहान मुली, रोजगाराचा अभाव यामुळे पैसेही नाहीत. त्यामुळे कुटुंबाचं पोट कसे भरायचे या विवंचनेत त्या त्रासून गेल्या होत्या. त्याला कंटाळून रुक्षणा यांनी घरी असलेल्या दिपाली आणि वृषाली या मुलींना विष पाजत स्वत:ही आत्महत्या केली. वृषाली ही फक्त ८ महिन्यांची आहे. तिने उलटी केल्याने तिचा जीव वाचला. तिच्यावर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
रुक्षणा हिच्या दोन मुली खरोंडा येथील जिल्हापरिषद शाळेत शिक्षण घेतात. मोठी मुलगी सुमन ही इयत्ता ३ री तर जागृती ही १लीमध्ये आहे. पुढील शिक्षणासाठी कुमारी सुमत व जागृती यांना जवळच असणाºया देहेरे शासकीय आश्रम शाळेत निवासी प्रवेश द्यावा, असे निर्देश यावेळी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी जव्हार प्रकल्प अधिकारी यांना दिले आहेत. तसेच लहान मुलगी वृषाली हिच्या नातेवाईकांसाबत बोलून बालगृहात ठेवण्याची व्यवस्था करण्याबाबत ठरवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पंडित यांनी याबाबत येथील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली.राष्टÑवादी, बविआकडून मदतया वाचलेल्या तीन मुलींचे राष्टÑवादी तसेच बविआने सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा आणि बविआचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय घेगड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कमळाकर धूम, अशोक चौधरी आदी उपस्थित होते.