आशिष राणे
वसई -93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांचे जानेवारी 2020 मध्ये "एल फोर" या पाठीच्या दु:खण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते. त्याच्यातून त्यांनी हळूहळू उभारी तर घेतली. मात्र साधारण मार्च 2021 मध्ये पुन्हा फादरांना वेदना होऊ लागल्या आणि त्यांना पुन्हा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या निरनिराळ्या तपासण्या केल्या, बायोप्सी केली.
त्यानंतर डॉक्टरांना समजून आले की, फादरांना "मल्टिपल मायलोमा" हा रक्ताच्या गाठी होण्याचा विकार झालेला असल्याचे निदान झाले. दरम्यान 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पदरी येऊनही संमेलनाच्या उदघाटना नंतर दुर्दैवाने संपूर्ण वर्ष फादर दिब्रिटो यांचे उपचारात व डॉक्टरांनी घातलेल्या मर्यादा पाळण्यात गेले. तरीही साहित्य संवर्धन व मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यभर फिरून, स्वतःच आखलेला नियोजित कार्यक्रम राबविता न आल्याची खंत त्यांनी लोकमत शी फोनवरून बोलून दाखवली आहे. मी लवकरच बरा होऊन, राहून गेलेले मायबोलीच्या सेवेचे कार्य माझ्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
फा. दिब्रिटो वयाच्या 78 व्या वर्षी आता नव्याने त्यांना गाठलेल्या "मल्टिपल मायलोमा" या रक्ताच्या गाठी होण्याच्या विकाराशी झुंज देत असून, वसई आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे औषध उपचार चालू असून त्यामूळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु ही व्याधी पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागेल.असे डॉक्टरांनी सांगितले. आता फा. दिब्रिटो हे नंदाखाल, विरार (प ) येथील आपल्या निवासी उपचार घेत असून, त्यांना केमोथेरेपी चालू केलेली आहे. तिलाही फादर चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना पूर्णपणे बरे होण्यास थोडासा अवधी लागेल. सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फादर कुणालाही भेटू शकत नाहीत. प्रार्थना करा. ते कोणाला भेटू इच्छित नसल्यामुळे आपल्या सदभावना फादरांच्या पाठीशी असू द्याव्यात, असे त्यांचे भाचे, फा. रेमण्ड रुमाव यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले.