विक्रमगड : गेल्या दोन महिन्यामध्ये भातशेतीला पोषक असा पाऊस होत असल्याने शेती बहरलेली असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने आपली संततधार सुरुच ठेवल्याने नदी, नाले तुडूंब वाहू लागल्याने भातशेती पाण्यामध्ये जाऊ लागली आहे़ जर पाऊस असाच कोसळत राहिला तर सतत पाण्याखाली राहील्याने भाताचे पीक कुजण्याची व त्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे ेक़ारण हाळव्या भाताची कणसे तयार होऊ लागली आहेत. जास्त पावसाने ती निवसवण्याची शक्यता आहे़ गेल्या आठवडाभरामध्ये विक्रमगड सर्कलमध्ये ३७६ मि़ मि तर तलवाडा सर्कलमध्ये ३२६ मि़ मि पावसाची नोंद करण्यात आली आहे़ आतापर्यत तालुक्यात ३००० मि़ मि पावसाची नोंद झाली आहे़शेती योग्य असा पाऊस झाल्याने गेल्या आठवड्यात सर्वत्र भातपिके बहरलेली होती.त्यांना अपेक्षित पोषक वातावरण मिळत होते़ विक्रमगड तालुक्यात समाधानकारक पाउस झाल्यान व नंतर त्याने उघडीप दिली तरी शेतक-यांनी भातमोसमातच शेतीचे कामे व लागवड केली. त्यामुळे सध्या या पिकाची कणसे भरली जात आहेत. या काळात उघडीपीची आणि उन्हाची गरज असते. त्याऐवजी सतत पाऊस पडत राहिला तर ही कणसे भरली जात नाहीत. त्यातील दाणे पोचट राहतात. आता भातपिकास भक्त शिडपणाची आवश्यकता असल्याने अधिक पाऊस धोकादायक ठरणारा आहे.गत आठवड्यापर्यंत सध्या भातपिकाची स्थिती उत्तम असून शेतकरी जरी सुखावला असला तरी गणरायाच्या सोबत आगमन करणाºया पावसाने संततधार सुरू ठेवल्याने गेल्याकाही वर्षात जसे भातपिकाचे नुकसान झाले होते तशीच परिस्थिती आताही निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़भाताला पोटरी येऊन कणसे तयार होऊ लागली आहेत़ सध्या भातशेतीचा कालावधी हा पोटरीचा आहे़ भाताच्ंया रोपांना फुले येत आहेत़ मात्र नेमका याच कालावधीत पाउस लांबल्यास पुढील प्रक्रिया थांबून पावसाच्या पाण्याने ही फुले कुजण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येऊ शकतो़ म्हणूनच आता थांब रे बाबा, अशी आळवणी शेतकरी करीत आहेत.
संततधार पाऊस न थांबल्यास भात शेतीला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:44 AM