पालघर : प्रकल्प नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. याउपर इथल्या सरकारला आणि जनतेला या प्रकल्पाला विरोध असेल तर आम्ही जनतेबरोबर राहू, असे भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केंद्राने वाढवण बंदराची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर सांगितले.
कोळी महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना आखण्यासाठी कोळी-मच्छीमार मेळाव्याचे आयोजन दांडी येथे मंगळवारी पार पडले. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
या मेळावानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या आमंत्रण पत्रिकेवर असलेल्या १७ समस्यांपैकी अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न आ. रमेश पाटील यांनी केल्याचे सांगून मच्छीमारांच्या डिझेल परताव्याचे वाटप कालबद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे आ. दरेकर यांनी सांगितले. डिझेल परताव्याच्या निधीतील मोठी रक्कम दुर्दैवाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आल्याने पालघरला कमी निधी मिळाला. त्यामुळे एक मच्छीमार समाज बांधव म्हणून त्यांच्या जिल्ह्यातील प्रश्नाकडे संवेदनशीलतेने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मच्छीमारांचे प्रश्न सुटावे यासाठी कोळी महासंघाचे पदाधिकारी दिवस-रात्र फिरून मेहनत घेत आहेत. शिवस्मारकाला आम्ही विरोध केला असून आमच्या ३०० मच्छीमारांची नुकसान भरपाई देत त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यास आमचा शिवस्मारकाला विरोध नसल्याचे आ. रमेश पाटील म्हणाले. अन्य राज्यातील मच्छीमारांचे प्रश्न सुटतात, मग आमचेच प्रश्न का सुटत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून तामिळनाडू, केरळ राज्यातील मच्छीमार महिलांसाठी राखीव फंड ठेवला जातो, मग इथे का नाही, असा सवाल त्यांनी केला. दांडी गावातील अनेक महिला रस्त्यावर मासे विक्रीसाठी बसतात, त्यांनी मागणी केल्यास मच्छीमार्केट उभारणीसाठी आपला आमदार निधी देण्याचे आश्वासन दिले. एनसीडीसीचे कर्ज, व्याज थकीत असल्यावर अन्य कर्ज मिळत नाही, मात्र शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाते. मग एका राज्यात वेगवेगळे न्याय का? असा सवाल त्यांनी केला.जबाबदारी आमचीमच्छीमारांना डिझेल परतावा मिळवून देण्याची जबाबदारी आता आ. दरेकर व माझी असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले. तर जिल्ह्यातील सर्व खाड्या प्रदूषित झाल्या असून तारापूर, पालघरमधील कारखान्यातील प्रदूषित पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते पाणी कारखानदार सोडत असल्याने मत्स्यसंपदा नष्ट होत असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.