- शाैकत शेखडहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गाने परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या बेकायदा लक्झरी बस, तसेच प्रवासी वाहनांची प्रादेशिक परिवहन खात्याकडून (आरटीओ) आच्छाड सह्याद्री हॉटेलजवळ सक्तीने तपासणी केली जात आहे. बेकायदा प्रवासी वाहनांना पुन्हा परत पाठवण्यात येत आहे. १ एप्रिलपासून परिवहन खात्याकडून ही तपासणी मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांना अन्य वाहनांतून अपेक्षित ठिकाणी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे बेकायदा प्रवासी वाहनांना महाराष्ट्रात मज्जाव करण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली इत्यादी राज्यांतून दररोज हजारो लक्झरी बस प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून प्रवेश करीत होत्या. यापूर्वी या लक्झरी बसवर दंडात्मक कारवाई आरटीओ विभागाकडून केली जात होती. पण, दिवसेंदिवस ती बेकायदा वाहतूक वाढत जात होती. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यांच्या सीमेवर असलेल्या आच्छाडजवळ आरटीओ अधिकारी तैनात करून परराज्यातील बेकायदा लक्झरी बस रिकाम्या करून त्यांना परत पाठवले जात आहे. लक्झरी बसला १२ मीटर लांबीची परवानगी आहे. मात्र, लक्झरी बसमधून जास्त पैसे कमावण्यासाठी लक्झरीमालक क्षमतेपेक्षा जास्त लांब बनवून तसेच क्षमतेपेक्षा जास्त आसन तयार करतात. त्याला कायदेशीर परवानगी नसताना परवानगीपेक्षा जास्त लांबीचे तसेच क्षमतेपेक्षा अधिक आसनक्षमता तयार करून आंतरराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा प्रवेश करणाऱ्या वाहनांना १ एप्रिलपासून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांना परिवहन खात्याकडून प्रतिबंध केला आहे. दरम्यान, दापचरी सीमा तपासणी नाक्यावर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धावणाऱ्या लक्झरी बसची कसून तपासणी करून कायदेशीर बसना प्रवेश दिला जात असल्याचे तेथील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे बसना सीमेवरूनच मागे फिरावे लागत आहे.
बेकायदा खासगी बसना राज्यात प्रवेश बंद, आच्छाड येथे आरटीओ तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:37 AM