हितेन नाईक /अनिरुद्ध पाटीलपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात रेती उत्खननाला बंदी असताना, समुद्र आणि नदी पात्रातून अनियंत्रित उपसा सुरू असून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात आहे. त्याचा मोठा फटका येथील पर्यावरण, पर्यटन आणि शेतीला बसत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही हानी सुरू असल्याने त्यावर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा ११२ कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यावरील वाळू साठे, मर्यादावेल, सुरू, नारळ, केवडा आदी प्रकारच्या औषधी झुडपांमुळे जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याने हा भाग नटला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातील कळंब, भुईगाव, केळवा, उसरणी, दांडे, चिंचणी, पारनाका, नरपड, चिखले, घोलवड, बोर्डी या किनाऱ्यांना पर्यटनाचे कोंदण लाभले आहे. मात्र रेतीमाफिया चौपाट्यांवर वाहने उतरवून रेती उपसा करीत असल्याने प्रचंड हानी सुरू आहे.
पात्र रूंदावल्याचा फटकासागरी किनाऱ्यावर कांदळवन, सुरू बागा असून हा भाग जैववीविधतेने नटाला आहे. या सौंदर्यावर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. मच्छीमारी व पर्यटन व्यवसाय हे प्रमुख रोजगाराचे स्रोत आहेत. तर किनाऱ्यांप्रमाणेच खाडी भागात शेती व बागायती असल्याने खाडीचे पात्र रुंदवल्यास क्षारयुक्त पाण्याचा शिरकाव होऊन शेतीला फटका बसू शकतो.
दररोज होणारा वाळूउपसास्थानिक महसूल व पोलीस विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचे उत्खनन सुरू आहे. शाळकरी विद्यार्थी, बेरोजगार युवक यांना हाताशी धरून व्यवसायाला मजबुती दिली जाते. तर आरटीओ कार्यालयाच्या बेजबाबदार प्रशासनामुळे महामार्गावर अवैधरीत्या रेतीची वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. पर्यावरणाच्या सुरू असलेल्या या हानीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जात नाही.
सततच्या रेती-उपशामुळे नदीपात्र उथळ होतात, शेवाळ हे नदी व खाडीतील मासे यांचे खाद्य असते. रेती काढताना ती नष्ट होते. रेतीसोबत माशांची अंडी देखील उपसली जातात. यामुळे नदी, खाडीतील माशांच्या संख्येवर परिणाम होतो. सतत रेती काढल्याने नदीचे पाणी गढूळ होते. ज्यामुळे माशांचे खाद्य- शेवाळ वाढत नाही. - प्रो. भूषण भोईर, पर्यावरण तज्ज्ञ