पालघर/नंडोरे : पालघर जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून जरी ओळखला जात असला तरी त्यातील अनेक कुटूंबे रोजगारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे ती रोजगारासाठी मोठ्या शहरात स्थलांतर करतात. पालघर येथील गोठणपूर भागातल्या दांडेकर मैदानात खेडोपाड्यातून जव्हार, मोखाडा, विक्रमगड अशा ठिकाणाहून गेल्या अनेक वर्षापासून अशी आदिवासी कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरीत झालेली आहेत. या मैदानात सुमारे १००० ते १२०० लोक सुमारे दिडशे ते तीनशे बांबू, ताडपत्री, गोणपाटे यापासून उभारलेल्या झोपड्यातून राहत आहेत. ही स्थलांतरीत कुटुंबे शहरातील बांधकाम व्यवसायीकांकडे मोलमजुरीसाठी नानातऱ्हेची कामे करताना आढळली. त्यांची मुले एकतर फुटकळ कामे करून रोजगार मिळवतात किंवा आईवडीलांच्या सोबत जाऊन त्यांच्या कामाच्या ठिकाणी खेळतात. त्यामुळे ती शिक्षणापासून वंचित राहतात.एखाद्या दिवशी रोजगार प्राप्त झाला नाही तर एक वेळच्या जेवणावर किंवा कधीकधी उपाशी पोटी राहण्याची वेळ या स्थलांतरीतांवर येते. त्यांच्याकडे रेशनकार्ड, आधारकार्ड यासुविधा निवासाचा पुरावा नसल्याने नाहीत तसेच त्यांची नावे मतदारयादीतही नाहीत. त्यामुळे सर्व शासकीय योजनांपासून ते वंचितच राहिले आहेत. नागरीसुविधा नसल्याने त्यांच्यात आरोग्याच्याही समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या फिरस्त जिवन पद्धतीमुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे मोठे आबाळ होत आहेत. (वार्ताहर) ग्रामपंचायत किंवा तेहींची माणस आमास ईचारीत नाय व हामीही त्यांना इचारीत नाय. तिथ काहीच नाही तर तिथ राहून करायचा तरी काय? इकड पैसे जमावायचा व पावसाळ्यात शेती-भाती किंवा मोलमजुरी करून गुजारा करायचा बस एवढंच आमचं आयुष्य.- सुनिल फसाळे, चालतवड, जव्हार, स्थलांतरीतापैकी एक
रोजगारासाठी स्थलांतरितांचे वास्तव भयानक
By admin | Published: February 04, 2016 2:04 AM