पालघर - लोकसभेसाठी युतीच्या वाटाघाटीत कळीचा मुद्दा ठरलेला पालघर मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याचे मानले जात असले, तरी पालघर नगरपालिका निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तेथील उमेदवार जाहीर करणे आणि त्यातून भाजपातील नाराजी ओढवून घेणे शिवसेनेने टाळले आहे. त्याचवेळी बहुजन विकास आघाडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाला साथ देत लोकसभेसाठी मैत्रीचे स्पष्ट संकेत दिले आहेत.पालघर नगरपालिकेसाठी रविवारी (ता. २४) मतदान होणार आहे. तेथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांत अटीतटीची लढत होत आहे. दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात आहेत.पालिकेसाठीच्या जागावाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. १९९९ ला नगरपालिका अस्तित्वात येताच १८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १० जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. तेव्हा शिवसेनेला चार, भाजपाला एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. २००४ मध्ये थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला, तर २५ जागांपैकी १७ जागा जिंकत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. जनाधार पार्टी तीन, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तीन,भाजपा एक आणि बविआ एक अशी स्थिती होती. २००९ मध्ये शिवसेनेविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआ, अपक्षांनी एकता परिषद स्थापना केली. त्यानंतर २५ पैकी शिवसेनेने १२, काँग्रेसने पाच, राष्ट्रवादीने तीन, बविआने तीन व अपक्षांना दोन जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेवेळी एकता परिषदेसा दोन अपक्षांची साथ दिली. २०१४ मध्ये २८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने १७ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीला १०, काँग्रेसला एक जागा मिळाली.यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली आहे. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढते आहे. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही. नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, बविआत आघाडी झाली असून राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत आहे.अशा घडल्या राजकीय घडामोडीशिवसेनेचा वरचष्मा असूनही मुख्यमंत्र्यांनी सभा घेत या परिसरावर आपले लक्ष असल्याचे दाखवून दिले. शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, तर भाजपाची राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात हजेरी लावली नाही. बविआने मात्र लोकसभेवर लक्ष केंद्रित करत हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीने प्रचाराची धुरा सांभाळली.
पालघरच्या राजकारणावर लोकसभेचाच प्रभाव, युतीत भाजपाला स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 6:13 AM