वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेने सुरू केलेल्या परिवहन सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असला तरी परिवहन प्रशासनाला गाड्या सोडण्याचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळता येत नसल्याचे दिसते. अर्नाळा गावात जाण्यासाठी रात्री प्रवाशांच्या रांगा लागत असतात. परंतु, त्याप्रमाणात बसेस मात्र सोडण्यात येत नाहीत. अनेकदा प्रवासी व परिवहन सेवेचे अधिकारी यांच्यामध्ये तू तू - मैं मैं होत असते.रविवारी सुटीच्या दिवशी अर्नाळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना परिवहन सेवेच्या बसेसमधून प्रवास करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी बसेस सोडण्यासंदर्भात योग्य नियोजन करण्यात येत नसल्यामुळे अर्नाळा ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत, अनेक तक्रारी लोकमतकडे आल्यानंतर प्रतिनिधीने रविवारी विरार रेल्वे स्थानक पश्चिमेच्या बस आगाराला भेट दिली. एसटी महामंडळाच्या आगाराला लागून परिवहन सेवेच्या बसेस उभ्या करण्यात येतात. अर्नाळा येथे जाण्यासाठी स्थानिक प्रवाशांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परंतु, येथील अधिकाऱ्यांनी अर्नाळ्यासाठी बस न लावता ३ प्रवाशांसाठी सत्पाळा बस उभी करून ठेवली होती. ही बस सुमारे अर्धा तास प्रवाशांच्या प्रतीक्षेत होती. तर, दुसरीकडे अर्नाळ्याचे सुमारे ५० ते ६० प्रवासी ४० ते ५० मिनिटे रांगेत उभे राहून बसची प्रतीक्षा करत होते. विशेष म्हणजे, त्या वेळी रस्त्यालगत ३ ते ४ रिकाम्या बसेस उभ्या होत्या. याबाबत, प्रस्तुत प्रतिनिधीने परिवहन सेवेचे ठेकेदार सकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अर्नाळा येथे प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे बसेस वेळेवर पोहोचत नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
परिवहनचा अदूरदर्शीपणा अर्नाळावासीयांच्या मुळावर
By admin | Published: November 16, 2015 11:38 PM