जव्हार : कुपोषण मुक्ती अभियानातील अभिनव ‘बाल संजीवन छावणी’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. कुपोषण निर्मूलनाच्या चळवळीतील हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले. संजीवन छावणी समाजाला आदर्श देणारे केंद्र असून विवेक पंडित यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी या प्रसंगी काढले.
श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टने, श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या संयुक्त उपक्र मातून जव्हार येथे ही छावणी निर्माण करण्यात आली आहे. पंढरपूरच्या पांडुरगांचे रूप आम्हाला जव्हार मोख्याड्यात भुकेल्या बालकांमध्ये दिसले आणि या छावणीचे निर्माण करण्याचे बळ मिळाले, असे सांगत या छावणीच्या उभारणीसाठी योगदान असलेल्या प्रत्येकाचे आभार पंडित यांनी व्यक्त केले. सरकार आणि समाज यांच्या समन्वयाचे हे केंद्र असेल, असेही ते म्हणाले.
जव्हार - मोखाडा या कुपोषणाचा प्रभाव असलेल्या भागात कुपोषण आणि व्यवस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेने पुकारलेल्या लढ्यामध्ये श्री विठू माऊली ट्रस्टने सामाजिक बांधिलकीचे एक कृतीशील पाऊल टाकले आहे. या संस्था संघटनांनी समर्थन आणि विधायक संसद या संस्थेच्या सहकार्याने कुपोषण आणि दारिद्र्य निर्मूलनाचे एक अभिनव केंद्र जव्हार येथे उभारले आहे. तिळसे येथील श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टने सुरू केलेल्या अभियानात मीरा - भार्इंदर येथील सफाई कामगारांनी अत्यंत मोठे योगदान दिले आहे. या सोबतच समाजातील विविध घटकातील अनेकांनी यथाशक्ती मदत केली.
यापूर्वी या भागातील कुपोषणावर आम्ही अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची नेहमीच दखल घेतली. आतापर्यंतच्या सरकारने इथे होणाऱ्या बालमृत्यूचे कारण हे वेगवेगळे आजार असल्याचे सांगत केवळ कारणे दिली. बालमृत्यूचे मुख्य कारण हे कुपोषण म्हणजे भूक हेच आहे हे मान्य करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे या मूळ कारणावर उपाय शोधणे सरकारकडून सुरू झाले, म्हणूनच पंडित यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
या छावणीला खासदार निधीतून मदत करणारे खासदार राजेंद्र गावित यांनी मनोगत व्यक्त करताना विठू माऊलीच्या कार्याचे तसेच विवेक आणि विद्युल्लता पंडित यांच्या कामाचे कौतुक केले. ठेकेदारांना पोसणाºया कामांना निधी देण्यापेक्षा संजीवनी छावणी सारख्या विधायक कामांना निधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. कुपोषणाचा आकडा कमी झाला असला तरी हा आकडा शून्यावर येण्यासाठी आम्ही या संस्थांच्या सोबत एकत्र प्रयत्न करू, असे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.