मंगेश कराळे
नालासोपारा : वसई पूर्वेकडील बाफाने फाटा परिसरात विनापरवाना सुगंधी प्रसाधने बनविणाºया कंपनीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न तसेच औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईद्वारे छापा घातला आहे. कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मशिनरी आणि कंपनीला सील ठोकले असून औषध निरीक्षक प्रवीण हरक यांच्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कंपनी मालक किरण भवरलाल जोगाणी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
पाळणापाडा येथील प्लॉट नंबर ३२ मधील गाळा नंबर ५१५ मध्ये ‘सेंट दि परफ्युम’ नावाची कंपनी नजीकच्या काळातच सुरू केली आहे. येथे विनापरवाना सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन करून विना बिल त्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दोन पथकांनी २५ जुलैला दुपारी या कंपनीवर धाड टाकली. पोलिसांना या कंपनीत काम करणारे दोन कामगार सापडले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड झाली. अन्न औषध विभागाला माहिती दिल्यानंतर त्यांनी येथे येऊन पंचनामा केला.विनापरवाना वेगवेगळ्या कंपनीच्या बॉटलमध्ये परफ्युम भरून विक्री करण्याचा गोरखधंदा करणाºया कंपनीवर धाड टाकली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मालाची दुबई, भारतातील अनेक राज्यात विक्री केली जात होती. कंपनी मालक मुंबईचा असून त्याचे नाव निष्पन्न झाले आहे त्याला लवकर अटक केले जाईल.- हितेंद्र विचारे, पोलीस उपनिरीक्षक, एलसीबी, वसई युनिट