मीरारोड - संस्था किंवा राजकीय पक्षाच्या आड बेकायदा कार्यक्रम करून प्रचार करण्यासह भेटवस्तू , जेवण आदी देऊन मतदारांना लालूच दिल्याच्या आरोपानंतर, आचार संहिता पथकाने माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा आणि आमदार गीता जैन यांचे नातलग सुनील जैन यांच्यावर आचार संहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत . मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात सत्ताधारी भाजपा कडूनच आचार संहितेचे उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे.
भाईंदर पश्चिमेच्या मांदली तलाव जवळील अग्रवाल गार्डन मध्ये रुद्र फाउंडेशन तर्फे १९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते . त्यावेळी रिक्षा चालकांना जेवण देण्यात आले तसेच त्यांना भेटवस्तू दिल्या गेल्या . तसेच रिक्षावर मुद्रक, प्रकाशकची नांवे आणि पत्ते नमुद न करता आ. गीता जैन यांचे फोटो सह जाहिरात केली गेली . या प्रकरणी काही व्हिडीओ व्हायरल होऊन तक्रारी केल्या गेल्या होत्या . सदर मैदान आ . जैन यांचा नातलग सुनील जैन याने भाड्याने घेतले असल्याने व कायर्क्रम संबंधित संस्थेचा असल्याने आदर्श आचार संहितेचा भंग केला म्हणून आचार संहिता पथकाच्या फिर्यादी वरून २२ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा सुनील जैन वर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तर लाडकी बहीण योजना लाभार्थी यांचा मेळावा भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी मीरारोडच्या एस.के. स्टोन येथील सेंट्रल पार्क हॉल मध्ये १७ ऑक्टोबर रोजी आयोजित केला होता . त्यासाठी शर्मा यांनी १६ रोजी परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली होती . तरी देखील येथे भाजपचे माजी आ. नरेंद्र मेहता यांच्या समर्थनार्थ कार्यक्रम केला गेला . या प्रकरणी सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी तक्रार केली होती . विना परवाना कार्यक्रम घेऊन आदर्श आचार संहितेचा उल्लघंन केल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष शर्मा वर मीरारोड पोलीस ठाण्यात २२ ऑक्टोबर च्या रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला . तर लाडकी बहीण कार्यक्रमात महिलांना टोकन दिले कि आणखी काही ? याची चौकशी केली गेली नसल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे .