नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असून, उत्पन्न घटल्यामुळे हे संकट ओढावले आहे. यावर एकमेव पर्याय म्हणजे झीरो बजेट शेती. शेतीतल्या संसाधनांचा शेतीसाठी वापर हे या तंत्रज्ञानाचे मूळ आहे. वाशीतील विष्णूदास भावे येथे आयोजित सामाजिक सेवा जीवनगौरव पुरस्कार सोहळ््यात पाळेकरांनी उपस्थितांना झीरो बजेट शेतीतून आर्थिक बजेटचा समतोल कसा राखता येता, याविषयीही मार्गदर्शन केले. सतीश हावरे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त समाजविकासाच्या दृष्टीने उत्तम योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यंदाच्या समाजसेवा जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरलेले विदर्भातील बेलोरा गावातील पद्मश्री सुभाष पाळेकर यांन या ठिकाणी गौरविण्यात आले. ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सकपाळ आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत पाळेकर यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचा जीवनगौरव करण्यात आला. लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, झीरो बजेट शेतीचा अवलंब केलेल्या एकही शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नाही, असेही पाळेकर यांनी ठामपणे सांगितले. एका देशी गाईपासून ३० एकर शेती करू शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कमीत कमी पाणी आणि वीज यांचा वापर करता झीरो बजेट नैसर्गिक शेती करता येते. तसेच जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचे असले तर हा एक उत्तम पर्याय आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सकपाळ यांनी पोलीस, पत्रकार, फोटोग्राफर यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.
नैसर्गिक शेतीनेच उत्पन्नात वाढ
By admin | Published: May 10, 2016 1:46 AM