हितेंन नाईक/अनिरुद्ध पाटीललोकमत न्यूज नेटवर्कपालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यात मागील दहा महिन्यात सर्पदंशाने नऊ जण दगावले आहेत, तर एकाला विंचूदंशाने प्राण गमवावा लागला आहे. गत तीन वर्षांत सर्पदंशाने सतरा जणांचा आणि तिघांचा विंचूदंशाने मृत्यू झाल्याची नोंद पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील आहे. पालघर जिल्ह्यातील सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अधिवासाची ठिकाणे विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या नानाविध प्रकल्पांच्या कामामुळे उद्ध्वस्त होत असून, नवीन वास्तव्याच्या शोधार्थ साप, विंचू आदी विषारी सरपटणारे प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत आहेत. तसेच हवेतली उष्णताही वाढत चालली असून, त्यापासून बचाव करण्यासाठी नेहमी रात्री बाहेर पडणाऱ्या प्राण्यांच्या हालचाली आता दिवसाढवळ्याही वाढू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीणबहुल भागात सर्पदंश, विंचूदंशाचे प्रमाण मोठे असल्याचे दिसून आले आहे. शेतामध्ये, घराच्या आडोशाला, रस्त्यात चालताना अंधारात पाय पडल्याने हे दंश होत आहेत. सर्पदंशामुळे गेल्या तीन वर्षांत उपचारादरम्यान हे १७ जण दगावले आहेत. या प्रकारे मृत्यू होऊनही नोंदी न झाल्यामुळे ही आकडेवारी आणखी वाढू शकते. पालघर जिल्ह्यात गेल्या वर्षी सर्वाधिक सर्पदंशाने चार मृत्यू हे डहाणू तालुक्यातील कासा रुग्णालयात झालेले आहेत. तर जव्हार रुग्णालयात तीन आणि मनोर रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत प्रत्येकी चार मृत्यू झाले असले तरी त्या तुलनेत या वर्षी मृत्यू झाल्याचा आकडा वाढला आहे. एप्रिल ते जानेवारीपर्यंत नऊ जण दगावले आहेत.
सर्प-विंचूदंश झाल्यानंतर दंश झालेल्या व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले जाते. तिथे प्राथमिक उपचार किंवा दंशाची लस देऊन पुढे उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात येते. बहुतांश वेळेला सर्पदंश झाल्यानंतर प्राथमिक उपचाराचे सखोल ज्ञान अथवा योग्य औषधोपचार मिळण्यास उशीर होत असल्याने त्या व्यक्तीवर उपचार करणे शक्य होत नाही. परिणामी, उपचारांमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागतो.
गतवर्षी दोन हजारांहून अधिक नागरिकांना सर्पदंश गेल्या वर्षी दोन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. २०१९-२० साली तीन हजारांच्या जवळपास तर २०१८-१९ साली तीन हजारांहून अधिक जणांना सर्पदंश झाले होते. या वर्षी २२३ जणांना विंचूदंश, गेल्या वर्षी ४५२ जणांना व १८-१९ मध्ये ३९३ जणांना विंचूदंश झाले आहेत. त्यामुळे या मृत्यूच्या घटनांमध्ये कमतरता आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखताना अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळतील, अशी व्यवस्था उभारणे गरजेचे बनले आहे.