- सुनील घरतपारोळ - कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.यंदा लॉकडाऊन काळात रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भरगच्च गर्दी, गर्दीने गजबजलेले फलाट असे चित्र मध्यंतरी काही काळ पूर्णपणे थांबले होते. रेल्वेसेवाच बंद असल्याने अपघातांचे प्रमाणदेखील कमी झाले होते. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच रेल्वे अपघातांचा आलेख यंदाच्या कोरोना महामारीत खाली आल्याने रेल्वे प्रशासनाला दिलासा मिळाला असला तरी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर झालेल्या अपघातांतील मृतांची अद्याप ओळख पटविण्यात वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याला यश आलेले नाही.मागील सहा वर्षांत रेल्वे अपघातांत मृत्यू पावलेल्या तब्बल ३७८ मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याने वसई रोड रेल्वे पोलिसांकडून मृतांची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा ते मीरा रोडदरम्यान एकूण ८ रेल्वे स्थानके येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. वसई-विरार शहरांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रवाशांची संख्याही वाढली आहे. या स्थानकांतून दररोज लाखो प्रवासी मुंबईत ये-जा करीत असतात. वाढत्या गर्दीमुळे प्रवास धोकादायक बनत चालला आहे. यामुळे विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. रूळ ओलांडणे, लोकलमधील गर्दीमुळे खाली पडणे, ओव्हरहेड तारेचा धक्का बसणे यामुळे प्रवाशांचे मृत्यू वाढले आहेत.मागील ६ वर्षांच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास वसई रोड रेल्वे स्थानकांच्या हद्दीतील बेवारस मृतदेहांचा आकडा थक्क करणारा ठरला आहे. मागील ६ वर्षांत अपघातांत मृत्यू झालेल्यांपैकी ३७८ प्रवाशांची ओळख पटलेली नाही. रेल्वे अपघातांत मरण पावलेल्या बेवारस मृतांची आकडेवारी मोठी असून मोठ्या प्रमाणात मृतांच्या वारसांचा शोध घेण्याचे आव्हान वसई रोड रेल्वे पोलिसांसमोर आहे. बेवारस मृतदेह रेल्वे पोलिसांना मिळाल्यावर त्याची पूर्ण चौकशी करून सात दिवसांपर्यंत त्याच्या नातेवाइकांचा शोध घेतला जातो. या व्यक्तीबाबत स्थानिक पोलीस ठाणे यांनाही कळविले जाते. सर्व प्रक्रिया करूनही ओळख न पटल्यास त्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येतात.- सचिन इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे
अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 1:54 AM