अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डीगणेशोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरु वात होऊन, विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. यावेळी बोर्डी परिसरातील स्थानिक केवडा काढणीच्या कामाला लागला आहे. गणेश पूजनासाठी वाढती मागणी आणि दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने केवड्याला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे उत्सवाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. हिंदूच्या धार्मिक कार्यात देव-देवतांच्या पूजेला महत्वाचे स्थान आहे. परंपरेनुसार प्रत्येक देवाला विशिष्ट प्रकारची पाने, व फुले वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा, जास्वंदी फूल, केवडा वाहिला जातो. दरम्यान, गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपल्याने केवड्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागातून केवडा काढणीला प्रारंभ झाला आहे. दिवसेंदिवस समुद्रकिनारा आणि शेती परिसरातील केवड्याची वने नष्ट होत आहेत. शिवाय केवड्याच्या काटेरी झुडपातून गाभ्यातील न उमललेला केवडा अलगद काढण्यासाठी शारीरिक श्रम पडतात. त्या तुलनेत मिळणारा नफा अल्प असल्याने नवी पिढी याकडे लक्ष देत नाही. मात्र, उत्सवाच्या काळात केवड्याची थेट विक्र ी शहरातील फुलबाजारात होत असल्याने घवघवीत उत्पन्न मिळते. स्थानिक पातळीवर प्रतिनग ५० रुपयांनी विकला जाणारा केवडा शहरातील फूलबाजारात चारशे ते पाचशे रुपयांनी विकला जातो. लोकल ट्रेनच्या माध्यमातून शहरातील गृहसंकुलांमध्ये जाऊन कडधान्य, फळे व पालेभाज्या इ. विक्री करणाऱ्या स्थानिक महिला उत्सव काळात गणपती पूजनाला आवश्यक अन्य पत्री आणि फुले आदींची विक्री करून चांगले पैसे कमवित आहेत.
गौरी,गणेशोत्सवासाठी केवड्याला वाढती मागणी
By admin | Published: September 01, 2016 2:39 AM