वसई : वसई-विरार महापालिकेला कोट्यावधींचा महसूल उपलब्ध देणारा वसईतील औद्योगिक पट्टा विकासापासून उपेक्षित आहे. अग्रवाल औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्त्यांची वाताहात झाली असून रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्गाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. काही वर्षांपूर्वी वसई-विरार महापालिकेने वसई पूर्वेतील औद्योगिक वसाहतींचा विकास आराखडा तयार करुन कोट्यावधींची विकास कामे केली होती. त्यात रस्ते, गटारे, फुटपाथ, स्ट्रीटलाईल इत्यादी कामांचा समावेश होता. परंतु त्यानंतर औद्योगिक वसाहतींकडे पालिका प्रशासनाने काणाडोळा केल्याने औद्योगिक वसाहतींमध्ये समस्यांनी गंभीर रुप धारण केले आहे. वसईतील औद्योगिक वसाहतीतून पालिकेला वार्षिक कोट्यवधींचा महसुल मिळतो. परंतु पालिकेकडून औद्योगिक वसाहतीकडे सापत्न दृष्टीकोनातून पाहत आहे. औद्योगिक वसाहतीतील मुख्य अंतर्गत रस्त्याची पूर्णत वाताहात झाली असून रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांनाही रस्त्यावरुन प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे असंख्य कारखाने असून त्यात शेकडो महिला-पुरुष कामगार काम करतात. या भागातून मोठ्या प्रमाणात मालाची आयात-निर्यात चालू असते. परंतु रस्त्याची दैन्यावस्था झाल्याने कारखानदारांचे नुकसान होत आहे.खराब रस्त्यांमुळे कारखानदार व कामगारांना रस्त्यावरुन चालणेही जिकरीचे होऊन बसले आहे. दुसरीकडे खड्डे चुकवून वाहने चालवली जात असल्याने या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून येथील अनेक ग्रामस्थांना व सार्वजनिक मंडळांना खड्डेमय रस्त्यातून गणेश मूर्त्या कशा आणाव्यात? या विचाराने भांडावून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी शिवसेनेचे वसई पंचायत समितीचे माजी सदस्य काकासाहेब मोटे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
उद्योगनगरीत खड्ड्यांचे साम्राज्य
By admin | Published: September 02, 2016 3:36 AM