हुसेन मेमन
जव्हार: १०० वर्षांचा वारसा लाभलेल्या संस्थानिक जव्हार नगरपरिषदच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून, रॅली, मिरवणूक, बॅनर बाजी, पत्रके वाटणे गल्लीबोळात जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटणे याला उत आला आहे. प्रचाराचे अगदी तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराने जोर धरला असून, सर्वच पक्ष आपआपल्या प्रचाराला गती देत आहेत. मात्र या प्रचारात प्रस्थापित राजकीय पक्षांनीच आघाडी घेतली आहे. तर अपक्ष आणि चिल्लर उमेदवार पिछाडीवर गेल्याचे चित्र आहे.सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीवरच भर दिला आहे. मात्र मतदार पुन्हा एकदा यापूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा संधी देईल की शिवसेनेला सत्तारुढ करेल असा प्रश्न सगळ््यांना पडला आहे.जव्हार नगरपरिषदेची सत्ता यापूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी भोगली आहे. याच दोन राजकीय पक्षांत जोरदार चुरस सुरु झाली आहे. मात्र पाच महिन्यांपूर्वी झालेल्या पाच वॉर्डातील पोट निवडणुकीत जव्हार प्रतिष्ठांनच्या उेमदवारांना मोठे यश देणारे मतदार या निवडणुकीत त्याच मताची पुनरावृत्ती करेल काय? हाच प्रश्न मतदारांना अजूनही पडलेला असून त्याचे उत्तर निकालानंतरच मिळणार आहे. मात्र राजकीय पक्षांनी ध्येय धोरणे, आखून निवडणुकीचे वातावरण आपल्याला अनुकूल करण्यासाठी पक्षातील दिगजांच्या प्रचार सभांना सुरवात केली आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीला एकहाती सत्ता दिली होती. परंतु, नगरसेवकांत फाटाफूट झाल्याने शहराचा विकास ठप्प झाला होता. त्याचा या निवडणुकीवर काय परिणाम होतो या वर सारे अवलंबून असेल.