- हितेंन नाईक
पालघर: पालघर जिल्ह्यातील सुमारे 550 खलाशी कामगारांना कुणी वालीच न उरल्याने अखेर रात्रीच्या अंधारात गुजरातच्या स्थानिकांकडून ट्रोलर्सवर अमानुषपणे दगडफेक केली तर भरती आल्यावर त्या ट्रोलर्सचे दोरखंड पोलिसांनी कापून त्यांना पुन्हा भुकेलेल्या अवस्थेत माघारी वेरावल बंदरात हाकलून लावण्यात पोलीस अखेर यशस्वी ठरले.
पोरबंदर, ओखा, वेरावल आदी गुजरातच्या विविध बंदरातून 7 महिन्याच्या कालावधी नंतर आपल्या घरी परतण्यासाठी सुमारे 1 हजार 800 खलाशी उंबरगाव येथे आल्यानंतर रविवारी फक्त गुजरात ,दमण आणि सेलवास येथील खलाशांना ट्रॉलर्स वरून उतरविण्यात आले. त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. परंतु महाराष्ट्र राज्यातील खलाशांना उतरवण्यास गुजरात सरकार व पोलिसांनी नकार देत त्यांना जबरदस्तीने ट्रॉलर्सवर रोखून धरले. लोकमतने पालकमंत्री दादासाहेब भुसे ह्यांन मोबाईल,स्वीय सचिव,मेसेज द्वारे अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
खासदार राजेंद्र गावित,आमदार हितेंद्र ठाकूर,आ.रवींद्र फाटक,जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे आदींशी संपर्क साधून जिल्ह्यातील अडकलेल्या 550 खलाश्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याबाबत वारंवार विनंत्या केल्या.आम्ही प्रसारमाध्यमे आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करतो असे त्या खलाश्यांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होतो.त्यामुळे मोठ्या आशेने हे कामगार प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत होते. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांना दिलासा देणारा निर्णय न आल्याने त्याचे मनोधैर्य खचले होते.ह्या दरम्यान 2-3 कामगारांना फिट ही आल्याने बेशुद्धावस्थेतील कामगारांना योग्य उपचार ही गुजरातच्या आरोग्य विभागा कडून न मिळाल्याने कांदा फोडून त्यांच्या नाकाला लावून त्यांना शुद्धीवर आणण्यात आल्याची माहिती एका कामगाराने आपल्या मोबाईल वरून स्थानिकांना दिली.
रात्री 10 च्या दरम्यान समुद्राला भरती आल्यानंतर पोलीस व काही स्थानिकांकडून त्यांना माघारी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या.कामगारांनी आपली तपासणी करून निवारा केंद्रात ठेवण्याची केलेली विनंती ही फेटाळण्यात आली. ह्यावेळी ट्रॉलर्सवरून घरी गेलेल्या काही स्थानिक सहकारी खलाशांनी ट्रोलर्सवरील आपल्या सहकाऱ्यांकरिता जमेल तेव्हडे जेवण आणले असताना, काही अविवेकी नागरिकांनी मात्र दगडफेक सुरू करीत त्या ट्रॉलर्स मालकाला नाईलाजाने तेथून जाण्याशिवाय गत्यंतर उरले न्हवते.ह्यावेळी दगडफेक सुरू झाल्याने अधिक पोलीस बंदोबस्त मागविण्यात येऊन नांगरलेल्या ट्रॉलर्स चे दोर कापण्यात आले.
गुजरात सरकारने त्यांच्या आरोग्य तपासणीची, खाण्या पिण्याची कोणतीच सोय केली तर नाहीच, शिवाय पोलिसी बळाचा वापर करून बोटिंना हुसकावून लावले. या सोसलेल्या नरकयातनाची माहिती ह्या कामगारांनी आपल्या नातेवाईकांना मोबाईलवरून दिली. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने अनेक कुटुंबे मानसिक दबावाखाली आली असून आपली मुले आणि कुटुंब प्रमुख ह्यांच्या जीवितास धोका निर्माण तर होणार नाही ना? ह्या चिंतेने रात्रभर रडत आहेत.