वाडा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या तिळसेश्वर येथे तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद पालघर यांनी १० महिन्यापूर्वी २० लाख रुपये खर्च करून बांधलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या निकृष्ट कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांनी सखोल चौकशी करून या कामाची दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यावी, अशी मागणी वाडा पूर्व विभागाचे सामाजिक कार्यकर्ते राजेश रिकामे यांनी केली आहे.
जिल्हा परिषद पालघर बांधकाम विभाग यांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत तिळसेश्वर येथील शिव मंदिर परिसरात शौचालय बांधणे व सुशोभीकरण करण्याचे काम मार्च २०१९ मध्ये करण्यात आले. १९ लाख ९९ हजार रुपये या कामासाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अवघ्या वर्षभराच्या आतच येथील शौचालयाचे दरवाजे निखळून पडले आहेत. भिंतीला तडे गेले आहेत.
या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तसेच हे ठिकाण दशक्रिया विधी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी या विधीसाठी वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर आदी ठिकाणाहून नागरिक येत असतात. मात्र येथील दुरवस्था झालेल्या शौचालयांमुळे विशेषत: महिलांची खूपच गैरसोय होत आहे. या कामाची सखोल चौकशी करून येथील शौचालय तातडीने दुरुस्त करण्याची मागणी रिकामे यांनी केली.