विक्रमगड : तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत अंतर्गत १२ पाड्यांत रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाला होता. याबाबत विद्यार्थी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती विक्रमगड कार्यालयात आठ महिन्यांपासून पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. याप्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर या रोहयोतील गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी अहवाल मागविला असून पंचायत समिती कार्यालयाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.तालुक्यातील खुडेद १०० टक्के आदिवासी वस्ती असलेले गाव असून रोजगार हमी योजनेच्या मार्फत अनेक रस्त्यांची कामे फक्त कागदावरच दिसत आहेत. या गावातील आदिवासी गरीब कुटुंबीयांतील काही शिक्षण घेतलेल्या तरुणांनी आवाज उठवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, या भ्रष्ट व्यवस्थेत त्यांचाही आवाज दाबला जात असल्याचे दिसून येत होते. सही करणाऱ्या व्यक्तीचे अंगठे टेकवून व अनेक मृत व्यक्तीच्या नावे तसेच अविवाहित तरुणांच्या पत्नींच्या नावाने पैसे काढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रघुनाथ गवारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून वृत्तपत्राचा बातमीचा आधार घेत प्रत्यक्षात गावात जाऊन रोहयो कामात मृत व्यक्तीची, स्थलांतरित मजुराच्या चौकशीला सुरुवात केली आहे. अशी माहिती रोहयोचे सहायक कार्यक्र म अधिकारी बाबासाहेब गायकवाड यांनी दिली.दरम्यान, रोहयो कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून या अधिकाऱ्यांकडून हा सर्व पैसा वसूल करावा, अशी मागणी युवा स्पर्श सामाजिक संस्था आणि आदिवासी विद्यार्थी कृती समिती यांनी केली आहे. (वार्ताहर)
खुडेद रोहयो भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
By admin | Published: October 15, 2016 6:32 AM