पालघर - विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयामध्ये झालेल्या दुर्दैवी घटने संदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमली असून त्या चौकशी समिती ने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी शुक्रवारी संध्याकाळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी महसुल मंत्री थोरात बोलत होते. जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्धामध्ये दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही या रुग्णालयाच्या भेटीला हजर होते.