मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर अंभई गावाच्या हद्दीतील छेडा वेफर्स कंपनीतून निघणाऱ्या दूषित पाण्याने भातशेती खराब झाली होती. याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शेतातील विहिरींच्या दूषित पाण्याची मंगळवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाहणी केली. तीन महिन्यांनंतर महसूल खात्याला जाग आल्याबाबत शेतकऱ्यांनी या वेळी नाराजीचा सूर आळवला.आठ वर्षांपासून कंपनीकडून शेतामध्ये घाण पाणी साेडले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत जूनमध्ये शेतीच्या कामाला सुरुवात हाेताच तहसीलदार कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कंपनीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही काेणीही दखल घेतली नाही. यानंतर आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांच्याकडे या समस्येबाबत व्यथा मांडल्यानंतर त्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. याआधी शेतकरी सुधाकर अकरे, वसंत अकरे व इतर शेतकऱ्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही एकदाही दखल घेतली नाही. मात्र, आमदार फाटक आणि जि.प. अध्यक्ष कामडी यांनी दखल घेताच महसूल खात्याने मंगळवारी पाहणी केली. मंडळ अधिकारी सदानंद भोई व तलाठी यांनी शेतात पाहणी करून पंचनामा केला. या पाहणीनंतर कंपनीवर काय कारवाई हाेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या पाहणीविषयी कंपनीचे व्यवस्थापक दत्ता बाेराडे यांच्याशी संपर्क केला असता गाडी चालवत असल्याचे सांगून बोलण्यास टाळाटाळ केली.कंपनीचे पाणी शेतात कसे येते, याचा पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वाडा तालुक्याच्या तहसीलदारांना देणार आहे. त्यानंतर त्यावर ते निर्णय घेतील.- सदानंद भोई, मंडळ अधिकारी, कंचाड-वाडाशेतीच्या नुकसानामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांनी सतत पाठपुरावा करूनही काहीच हाेत नव्हते. आता अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने दिलासा मिळाला.
दूषित पाण्याने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:23 AM