पालघर : सातपाटी सागरी पोलीस स्टेशनचे माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्यासह अन्य सात साथीदारांनी आपल्याला खोटया गुन्हयात गुंतवून त्यानंतर आपल्या एटीएमच्या माध्यमातून १७ लाख उकळल्याची तक्रार मे. युरो स्पाझीओ आय एन सी या कंपनीचे मालक शिरीष महेंद्र दलाल यांनी पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांच्याकडे केली आहे.पालघरच्या बिडको औद्योगिक वसाहतीमधील मे. युरो स्पाझीओ या कंपनीचे मालक दलाल यांनी इंडीयन बँकेकडून आपल्या कंपनीसाठी कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाची वेळेत परतफेड न झाल्याने बँकेने कंपनीला सील केले होते. अशा वेळेस मालक महेंद्र दलाल यांनी बँकेला कुठलीही पूर्व कल्पना न देताच कंपनीमधील १० लाखाची मशिनरी व साहित्य परस्पर विकल्याच्या तक्रारीवरून सातपाटी सागरी पो. स्टे. सहा. पोनि. भुजंग हातमोडे यांनी दलाल यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे असलेले डेबीट कार्ड, १६ हजाराची रोकड, मोबाईल हातमोडे यांनी ताब्यात घेतला होते. सदर डेबीट कार्ड ब्लॉक करावे लागेल असे सांगून हातमोडे यांनी दलाल यांच्याकडून पिन कोड नंबर मिळविला. तसेच नेटबँकींगचा नंबरही हातमोडे यांनी बळजबरीने आपल्याकडून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अटकेत असताना संघटनेच्या तीन साथीदारांनी दलाल यांची भेट घेत जामीनावर सुटायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून लुबाडले. सहा. पो.नि. हातमोडे यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून प्रथम दोन लाख व पुढे दीड लाख असे साडे तीन लाख रूपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नव्हे तर जामीनावर सुटून आल्यानंतर आपल्या बँकेतील रक्कमही मोठया प्रमाणात काढण्यात आल्याचे दलाल यांच्या निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)उद्योगपती दलाल यांच्या बँक खात्यातून २१ एप्रिल ते २३ जून या कालावधीत १६ लाखाच्या रकमेवर डल्ला मारताना नॅशनल ज्वेलर्स पालघर, लीलावती ज्वेलर्स बोरीवली, आराधना ज्वेलर्स, ठाणे इ. ज्वेलर्सच्या दुकानातून ३ लाख ६७ हजार ४०० रूपयाचे दागिने खरेदी केले, एन ई एफ टी च्या माध्यमातून ७ लाख ६४ हजार, आॅनलाईन व्यवहारासाठी विविध कंपन्यांना २ लाख ३३ हजार ६५१ रूपये, चेक व्दारे ३ लाख ५० हजार तसेच एटीएमव्दारे २ लाख ९५ हजाराची रोकड बँकेतील खात्याचा गैरवापर करून लुबाडण्यात आली आहे. या कामी आरोपी म्हणून सहा. पो.नि. भुजंग हातमोडे, रणधीर कौमदिकांत चक्रवर्ती, (रा.खार दांडा), इंडियन बँकेचे अधिकृत सिग्मा इंजिनीअरींग कन्सल्टंट तर्फे अधिकृत व्हॅल्युअर (नाव माहित नाही), अशोक नायर, (चिंतू पाडा), विजेंद्र सिंग उर्फ कॅप्टन (होलीस्पिरीट शाळेजवळ पालघर) पूजा वीजेंद्र सिंग, कैदास प्रसाद, तुलसी प्रसाद उर्फ बबलू त्रिवेदी (रा.खारपाडा) इ. व्यक्तींवरील गैरकृत्यात सहभागी असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी उद्योगपती दलाल यांनी केली आहे.