राहुल वाडेकर, विक्रमगडपालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत वाडा व विक्रमगडच्या ९० तरुणांना बोईसर येथील कंपनी प्रशासनाने प्रशिक्षण देण्याऐवजी राबवून घेतल्याने ८० प्रशिक्षणार्थ्यांनी घर गाठले आहे. कौशल्य विकास हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या याद्वारे बेरोजगार युवकांना प्रशिक्षण दिल्यामुळे कुशल मनुष्यबळ तयार होईल. त्यांना निश्चितपणे रोजगाराची संधी मिळावी हा या मागचा उद्देश आहे. या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात प्रथम वाडा येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून वाडा व विक्रमगड तालुक्यातील ९० बेरोजगारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.या सर्व तरुणांना बोईसर येथील बॉम्बे रियोंन फॅशन लिमिटेड या कंपनीत प्रशिक्षणासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी हेल्पर म्हणून काम करायला लाऊन झाडू मारणे, प्लांट मधील पाणी काढायला लावणे, सुताचे रोल भरून येणाऱ्या गाड्या खाली करायला लावणे अशी कामे करायला लावल्याने हे प्रशिक्षणार्थी कंटाळून शेवट प्रशिक्षण सोडून घरी आले. त्याच बरोबर येथे दिले जाणारे भोजन सुद्धा खुप कमी मिळत असल्याची तक्रार अनेक प्रशिक्षणार्थीनी केली. त्यामुळे या ९० जणांपैकी जवळपास ८० प्रशिक्षणार्थी निधून आले आहेत. त्यामुळे या कौशल्य विकास कार्यक्रमाचा बोजवारा उडल्याचे दिसून येत आहे.
प्रशिक्षण देण्याऐवजी घेतले राबवून
By admin | Published: October 05, 2016 2:23 AM