पारोळ : मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील सकवार येथील इंडियन आॅईलच्या श्रीजी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांमध्ये पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरले गेले. येथून इंधन म्हणून पेट्रोल भरून पुढे गेलेली वाहने प्रवासातच अर्ध्या रस्त्यात बंद पडली. चालकाने मेकॅनिकला बोलावले असता, इंधनात पाणी गेल्याने गाडी बंद पडल्याचे समजले. याबाबत आपली बाजू मांडताना पंप चालकाने झाल्या प्रकारासाठी शासनाला जबाबदार धरले आहे. शासनामार्फत जे १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यात येते त्यामुळे पाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर पंपावर पेट्रोल भरून एक चालक गुजरात दिशेकडे निघाला. मात्र, तीन साडेतीन किमी. पुढे गेला असताना त्याची कार भरपावसात रस्त्यातच बंद पडली. चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून मेकॅनिक बोलावला असता इंधनात पाणी असल्याने बिघाड झाल्याचे समजले. यामुळे वाहनचालकाने खानिवड्यातील नातेवाईक हरिश्चंद्र पाटील आणि भामटपाडा येथील अजित किणी याच्याबरोबर श्रीजी पंपावर धाव घेतली. याचवेळी येथे एका दुचाकीत पेट्रोल भरणे सुरू होते. ते चेक केले असता पेट्रोलऐवजी चक्क पाणी पंप होताना दिसले. हा प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. याबाबत स्पष्टीकरण देताना पंप चालक केयूर पारीख याने याचे खापर शासनावर फोडले. शासन मिसळत असलेले इथेनॉल हे हायड्रोस्कोपिक असल्याने पाणी खेचते. तसेच स्टोक टँक बसवणे हे कंपनीचे काम असून आम्ही फक्त खरेदी करून विक्री करतो, असे सांगितले. शासनाने पावसाळ्याचे चार महिने इथेनॉल मिसळणे बंद करावे, अशी मागणी पेट्रोल असोसिएशनचा सेक्रेटरी म्हणून आपण करत असल्याचेही ते म्हणाले. मात्र, असे जर असेल तर हा प्रकार इतर पंपांवरही व्हायला हवा होता, असे त्यांना विचारले असता, ते काहीही बोलू शकले नाहीत. दरम्यान, पीडित चालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कोसळणाºया पावसामुळे कुठूनतरी पाणी आत घुसले असावे. स्टोक टँक आणि पंपिंगच्यामध्ये असणारे गॅस्केट लीक असावे, असे ते म्हणाले.