लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तांनी महिला सुरक्षितता समितीच्या बैठकीत मीरा भाईंदर व वसई व्रत महापालिकांना महिला सुरक्षिततेसाठी २७७ निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीज दिवे बसवण्याच्या सूचना केल्या आहेत . मीरा भाईंदर महापालिकेने वीज दिवे बसवण्याची तयारी दर्शवली असली तरी सुरक्षा रक्षक नेमण्यास व सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलेला नाही .
शहरातील निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलींच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पोलिसांनी मीरा भाईंदर शहरात अश्या १९६ तर वसई विरार शहरात ८१ ठिकाणांची यादी बनवली आहे . निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी महिला - मुलीं सोबत गैरप्रकार होण्याची भीती असते . शिवाय गर्दुल्ले - मद्यपी, व्यसनी आदी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वाढता वावर महिला - मुलींच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचा ठरू शकतो . उनाडटप्पू व रोडरोमियोंचा धोका असतो .
महिला सुरक्षितता समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी महिला सुरक्षेचा आढावा घेतला . बैठकीत निर्जन व अंधाऱ्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे , सीसीटीव्ही व वीजदिवे महापालिकांना बसवण्याच्या सूचना पांडेय यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांना केल्या . वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस मध्ये सीसीटीव्ही बसवण्यास पोलिसांनी सांगितले आहे .
सुमारे ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास पालिकांना सांगितले असून मीरा भाईंदर महापालिकेने पोलिस आयुक्तांच्या निर्देशा नुसार पोलिसांनी दिलेल्या ठिकाणी वीजदिवे बसवण्याची कार्यवाही सुरु केल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले . सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून सीसीटीव्ही साठी पालिके कडे निधी नसल्याने आमदारांच्या मदतीने शासना कडून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न पोलीस व पालिका करणार असल्याचे डॉ . पानपट्टे यांनी सांगितले .
वसई विरार महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले कि , महिलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निर्देशक नुसार आम्ही महावितरण ला पोलिसांनी दिलेल्या ठिकाणांवर वीजदिवे बसवण्यास कळवले आहे . समुद्र किनारे किल्ले तसेच अन्य निर्जन ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची कार्यवाही सुरु आहे . शहरात सीसीटीव्ही बसवले जात असल्याचे मुठे म्हणाले .