- सुरेश काटे।लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : तालुक्यातील अनेक ठिकाणी वैध बरोबर अवैध दगडखाणी मोठ्या प्रमाणात असून येथे अवैधरित्या सुरु ंगाचे स्फोट करून मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. या खाण मालकांकडे दगड उत्खनन करताना स्फोटाची परवानगी नसतानाही ते प्रचंड क्षमतेचे स्फोट करत आहेत. आगादरच येथे भुकंप होत असून अनेक घरांना भेगा पडल्या असल्याने या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत.
या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरात आहे घरांना तडे जात आहेत. पाण्याची पातळी खोल जात आहे. परंतु शासकीय आशिर्वादाने सुरू असलेले हे सुरु ंगाचे स्फोट काही केल्या थांबत नाही. एखादी भीषण दुर्घटना निवडणुकीच्या काळात घडल्यावर शासकीय यंत्रणा कारवाई करणार का हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तलासरी भागात खाणीत होत असलेल्या प्रचंड सुरुंग स्फोटा बाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर खडबडून जागे झालेल्या तलासरी महसूल विभागाने खाणीची तपासणी करून दोन खाणीवर जुजबी कारवाई करून चार लाखाचा दंड आकाराला. मात्र, या खाणीत होत असलेल्या सुरूंग स्फोटाबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खाण मालकांना चाप बसण्यायेवजी या स्फोटांमध्ये वाढ झाली आहे. पण ना पोलीस कारवाई करीत ना महसूल विभाग. तलासरी परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरात आहे. या धक्क्याने आदिवासी ग्रामस्थ भयभीत आहेत. या वर कुंभकर्णी शासकीय यंत्रणा कोणतीही ठोस उपाय योजना करीत नाही. ४.३ रिश्टर चे धक्के बसूनही यंत्रणा बेफिकीर आहे दीड ते दोन हजार घरांचे नुकसान होऊनही यंत्रणा बेफिकीर आहे.
या भूकंपाच्या हादऱ्यांनी जनता हैराण असताना, खाबूगिरीमुळे तलासरी भागात खाणीमध्ये स्फोटाची मालिका सुरूच आहे. तलासरी भागात खाणीना सुरु ंग स्फोट करून दगड उत्खनन करण्याची परवानगी नसल्याचे तलासरीच्या तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी स्पष्ट केले असताना येथे सुरु ंगाचे स्फोट होतात कसे? महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी गस्त घालत असताना या गोष्टी त्यांच्या निदर्शनात येत कशा नाहीत? की खाणी मालकांशी त्यांनी हात मिळवणी केली आहे. असे प्रश्न विचारले जात आहेत.
लोकमतच्या वृत्ताने तहसीलदारांनी नायब तहसीलदार मनोहर तांबोळी यांना तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनीही फक्त दोन खाणी वर प्रत्येकी १ लाख ८४ हजाराची दंडात्मक कारवाई करुन कागदीघोडे हलविण्याचे काम केले. वास्तविक खाणी मालक नाम मात्र रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात सुरूंग स्फोट करुन दगड उत्खनन करीत असतात. यावर कुचकामी कारवाई करुन त्यांना प्रात्साहन दिले जात आहे.खाणीमध्ये स्फोट करणारे कर्मचारी व मजुर हे राज्यस्थानातील असून स्फोट करण्याचे त्यांच्याकडील परवाने हे राजस्थान सरकारचे आहेत. दरम्यान, तलासरी तालुक्यामध्ये स्फोटाची परवानगी नसताना मनमानी पद्धतीने खाणीमध्ये सुरु ंग स्फोट करण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांच्या कडे असणाऱ्या राजस्थानी परवान्यांकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. महसूल विभागही पोलिसांना या विरोधात कारवाईचे आदेश नाहीत.आतापर्यंत मुंबईत झालेल्या स्फोटांचा इतिहास पहाता या स्फोटात वापरलेले जिलेटीन वा डेडोनेटर्स हे राजस्थान गुजरात मार्गे महामार्गाने मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे तलासरी पर्यंत पोहोचलेली स्फोटके मुंबईत पोहोचून निवडणुकी दरम्यान घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आर्थिक हित संबंधामुळे महसूल विभाग ठोस कारवाई करीत नाही, खाणीतील स्फोटांनी हादरे बसत असून भूकंपामुळे पडलेल्या भेगा धोकादाय बनल्या आहेत.-भानुदास भोये पं.स. सदस्य