- शौकत शेखडहाणू : डहाणूतील सावटा येथील जमशेद आणि शिरीन गझदर दृक्कला महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील कलाकार आणि नवोदित विद्यार्थी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ८ ते १७ फेब्रुवारीपर्यंत १० दिवस ‘डहाणू आर्ट ईको २०२० कला महोत्सव व आंतरराष्ट्रीय निसर्ग चित्रण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात रशिया, फ्रान्स, कझाकीस्थान, थायलंड यासारख्या ११ देशांतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध २५ चित्रकार सहभागी होणार आहेत.
या महोत्सवामध्ये कितालो जसलिव्ह, इरिन दावस्कीया, थेयामी मनू आणि अन्य भारतीय चित्रकार सहभागी होणार आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पालघर, डहाणू, जव्हार, कासा, उंबरगाव, संजान इत्यादी ठिकाणी जाऊन हे चित्रकार प्रत्यक्ष निसर्गचित्रण (लॅण्डस्केप) साकारणार आहेत. एकाच व्यासपीठावर स्थानिक चित्रकार व आंतरराष्ट्रीय चित्रकार एकत्र आल्याने कला विकासासाठी व्यापक चर्चा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पालघर जिल्ह्यातील वारली चित्रकलेच्या बाबतीत येथे चर्चा होणार आहे. तसेच येथील स्थानिक सांस्कृतिक कलांचा परिचय उपस्थितांना होणार आहे.
या कार्यक्रमाचा स्वागत सोहळा १० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४.३० वाजता सेंट मेरीज हायस्कूल येथे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार आहे. कला संचालक, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुबईचे राजीव मिश्रा व अतिथी म्हणून भा.न. तिगले, निरीक्षक, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या कार्यक्र माचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य विनय पाटील यांनी केले आहे.
डहाणूतील सावटा येथील जमशेद आणि शिरीन गझदर दृक्कला महाविद्यालय २००४ पासून कला शिक्षण देण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहे. ठाणे पालघरसह गुजरातमधील उंबरगाव येथील आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन समाजात नावलौकिक मिळवत आहेत. याफोटो - डहाणू निसर्गचित्र