वसई : मच्छीमारांचा पालिकेला ठिय्या आंदोलनाचा इशारा देताच महापालिका व महसूल विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान सार्वजनिक वापराच्या जागेवरील अतिक्र मणांवर कारवाई करण्याबाबत तसेच त्यासाठी लागणारे सर्व मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री पुरविण्यास महापालिका तयार असल्याबाबत आता वसई तहसील कार्यालयास कळविण्यात आल्याचे सांगून आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या मच्छिमारांना पालिकेने या प्रकरणी येत्या दि.२५ फेब्रुवारी रोजी चर्चेचे निमंत्रण दिले असल्याची माहिती मच्छीमार संस्थेचे संजय कोळी यांनी दिली.
आपण ठिय्या आंदोलनाचा अनुचित प्रकार करू नये, असे ही मिच्छमारांना सांगण्यात आल्याचे मच्छीमार बंधूंनी सांगितले, दुसरीकडे, तीन वर्षे अक्षम्य बेजबाबदारपणा दाखवून अतिक्र मणांना मोकळे रान देणारे महापालिका प्रशासन जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाईस आरंभ करत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धारच मच्छीमारांनी यावेळी केला आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या नियोजित आंदोलनाबाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. वसईच्या पाचूबंदर येथील मच्छिमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवरील अतिक्र मणांबाबत वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था गेल्या तीन वर्षांपासून महापालिका तसेच तहसील कार्यालय यांच्याकडे तक्र ारी करत आली आहे. तर या जमीनी महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची सबब पुढे करून तहसीलदार किरण सुरवसे हे आपले हात झटकत आहेत. एकूणच महापालिकेच्या वसई विभागाचे प्रशासन शासकीय जमिनीवरील अतिक्र मणांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल खात्याची असल्याचे सांगून याप्रकरणी काखा वर करत आहे. तीन वर्षांच्या या टोलवाटोलवीमुळे अतिक्र मणांचे प्रमाण प्रचंड वाढले असून आता तर तिवरांची कत्तल करून व पाणथळ जमिनीचे लचके तोडून अतिक्र मण होऊ लागले आहे. या बाबत वसईचे तहसील कार्यालय केवळ पंचनाम्यांचे कागदी घोडे नाचवून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. याठिकाणी बेसुमारपणे फोफावत असलेल्या अतिक्र मणांमुळे आणि परप्रांतीयांच्या सुळसुळाटामुळे पाचूबंदरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पालिकेचे तहसीलला पत्र; चर्चेचे दिले निमंत्रणपाचूबंदरातील अतिक्र मणांवर उचित कारवाई करणेबाबत आवश्यक सामुग्री व मनुष्यबळ पालिकेतर्फे पुरविण्याबाबत तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी ठिय्या आंदोलनाचा अनुचित प्रकार करू नये, असे आवाहन प्रभाग समिती ’आय’चे प्रभारी सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी केले आहे. या प्रकरणी काही चर्चा करावयाची असल्यास दि,२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता पालिकेच्या वसई कार्यालयात उपस्थित राहण्याचे ही मच्छिमारांना सांगण्यात आले आहे.संयुक्त सभेची मच्छीमार समितीची मागणीदुसरीकडे, महापालिका व तहसीलदार दोघे ही टोलवाटोलवी करत असून त्यामुळे चर्चा करायचीच असेल तर तहसीलदार, प्रभारी सहाय्यक आयुक्त, अतिक्र मणधारकांकडून मलिदा लाटून त्यांना वीज पुरवठा देणारे वसई पारनाका येथील महावितरणचे अधिकारी आणि पोलीस अशी संयुक्त सभा घेण्याची मागणी मच्छिमारांकडून होत आहे. अन्यथा दि,२८ फेब्रुवारी राजी ठिय्या आंदोलन होणारच असा निर्धार व्यक्त करून यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही मच्छिमारांनी दिला आहे.