पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक, टंकलेखक भरती प्रक्रियेत एकही स्थानिक तरुणाची निवड करण्यात न आल्याच्या निषेधार्थ चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्याने दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी निर्धार संघटनेचे अध्यक्ष व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत घुसून स्थानिक तरुणांच्या भविष्यासाठी काही करणार आहात की नाही, असा उद्वेगजन्य प्रश्न उपस्थित केला.१ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्हानिर्मितीची घोषणा करण्यात आल्यानंतर वर्षानुवर्षे उपेक्षित, अविकसित असलेला ग्रामीण भाग, रोजगाराकरिता कुटुंबासह विस्थापित होणारा आदिवासी बांधव तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना शासकीय, निमशासकीय, खाजगी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, अशी माफक अपेक्षा होती. परंतु, वर्षभराच्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्याव्यतिरिक्त कुठलाही विकास झाला नसल्याचे संखे यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लिपीक व टंकलेखकपदाच्या १३४ जागांच्या भरतीदरम्यान बेरोजगार तरुण व त्यांच्या पालकांच्या मनात आपल्या मुलांच्या नोकरीचा महत्त्वाचा प्रश्न सुटेल, अशी महत्त्वपूर्ण आशा निर्माण झाली होती. परंतु, दोन वेळा या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर व या पेपरफुटी प्रकरणात परजिल्ह्यांतील परीक्षार्थी आरोपी असतानाही १३४ जागांसाठी निवडलेल्या २६६ परीक्षार्थींपैकी सर्व परजिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे संखे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून पालकमंत्री, खासदार, सर्व आमदार यांना स्थानिक तरुणांना न्याय देण्याची मागणी केली. पत्रकार संघाच्यावतीनेही या भरतीला स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. (वार्ताहर)
नियोजन बैठकीत घुसून मांडले प्रश्न
By admin | Published: November 07, 2015 10:17 PM