कासा : डहाणू आणि पालघर तालुक्यातील शेतीला उन्हाळ्यात सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांनी पाणीपुरवठा केला जातो. परंतु पाच वर्षापासून त्यांची दुरूस्तीच न झाल्याने बऱ्याच ठिकाणी ते नादुरूस्त झाले आहेत. काही ठिकाणी बांधकाम व प्लॅस्टर तुटले आहे. भरावाचा काही भाग निघून गेला आहे. परिणामी, त्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होते. यंदा कालव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात केला जाणाऱ्या शेतीवर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगतात. सिंचनासाठी धामणी येथे सूर्यानदीवर हा प्रकल्प उभारण्यात आला. या अंतर्गत आदिवासी भागातील डहाणू, पालघर आणि विक्रमगड तालुक्यातील १४ हजार ५०० हेक्टर जमिन सूर्या कालव्यांतर्गत सिंचनाखाली आणण्यात आली. पालघर जिल्ह्यातील सुमारे ७५ गावांना उन्हाळ्यात या धरणातून शेतीसाठी कालव्यांतर्गत पाणी सोडले जाते. बऱ्याच ठिकाणी हे कालवे डोंगरालगत असल्याने पावसाळ्यात वाहून आलेले दगड, गोटे, माती साचून भरले आहेत. त्याचप्रमाणे कालव्यांना जोडणारे लघु कालवे काही ठिकाणी कच्च्या स्वरूपाचे माती भरावाचे असल्याने माती, रेती साचून ते उथळ झाले आहेत. तर मुख्य कालव्यातून व लघु कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा करणारे गेटही माती, दगड, गोट्यांनी भरलेले आहेत. तसेच त्यांची वेळोवेळी दुरूस्तीच न झाल्याने पाण्याची गळती होते.१० वर्षापूर्वी सूर्या प्रकल्पाची सूर्यानगर, पालघर व वाणगांव येथील सर्व कार्यालये १०० ते १२० कि. मी. अंतरावरील शहापूर येथील भातसा कालवा क्र. १ येथे स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे येथील अधिकारी दुरवर येवून कालव्यांच्या दुरूस्तीकडे नियमीतपणे लक्ष देत नाहीत व साफसफाईची कामेही होत नाहीत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडून वेळोवेळी पाणीपट्टी भरूनही दुरूस्तीच होत नाही.वाड्यात मजुरांचा प्रश्न बिकटवाडा : यंदा पाऊस कमी झाला असला तरी भातपीक बहरले आहे. या दमदार पिकांमुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, येथे मजुरांचा प्रश्न बिकट बनल्याने शेतीची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. तालुक्यात १७६ गावे व २०० हून अधिक पाडे आहेत. येथे १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेतले जाते. त्यातही झिनी, गुजरात, सुरती, कर्जत, मसुरी, सुवर्णा, दप्तरी, सोनम या भाताच्या वाणाची लागवड करून शेतकरी उत्पन्न घेतात. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण प्रसिद्ध आहे. या भातशेतीला मजुरांची जास्त आवश्यकता भासते. परंतु, औद्योगिकीकरणामुळे येथील मजूर कारखान्यात व रेती व्यवसायावर कामाला जातात. त्यामुळे येथे त्यांची सतत कमतरता भासते आहे. भातकापणी व झोडणीसाठी येथील सधन शेतकऱ्यांनी तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा व नाशिक येथून मजूर आणले आहेत. या मजुरांना प्रतिदिन २५० ते ३०० रुपये अधिक तीन वेळा जेवण दिले जाते. हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यातच या मजुरांची मनमानी वाढली असून त्यांच्याअभावी भातशेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सध्या भातपीक तयार झाले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने कापणी खोळंबली आहे. ज्यांना मजूर मिळालेत, त्यांची कापणीची कामे जोरात सुरू असून काही शेतकऱ्यांनी तर झोडणीच्या कामालाही सुरुवात केली आहे. सूर्या कालव्यांची पाच वर्षांपासून दुरूस्ती होत नाही त्यामुळे शेतीवर परिणाम होतो.- मंगेश वावरे, शेतकरी
सूर्याच्या दुरूस्तीअभावी भातपिकाचे सिंचन अपुरे
By admin | Published: November 03, 2015 1:06 AM