राहुल वाडेकरविक्रमगड : शेतीला सिंचनासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेनुसार सिंचन विहिरीची योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, कागदपत्रांच्या जंजाळात अडकलेल्या या याेजनेंतर्गत ९४ गाव-पाडे असणाऱ्या विक्रमगड तालुक्यात सध्या रोहयो योजनेंतर्गत सिंचन विहिरीचे एकही काम सुरू नाही. तालुक्यातील विविध गावांतील ३० विहिरींचे प्रस्ताव ३४ प्रकारच्या विविध कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अपूर्ण असल्याचे कारण देत दाेन वर्षांपासून जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीकडे परत पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे ही याेजना लालफितीत अडकल्याची स्थिती दिसत आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे, असा आराेप लाभार्थी करत आहेत. या विहिरींना जि.प. व पं.स.कडून मंजुरी देऊन ही सिंचन विहिरींची कामे सुरू करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. या याेजनेमुळे पाणीटंचाईवर मोठी मात होऊ शकते. मात्र, जि.प. व पं.स. कागदपत्रांच्या पूर्ततेत ही याेजना अडकवून दिरंगाई करत असल्याचा आरोप लाभार्थी करत आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामासाठी शासन तीन लाखांचे अनुदान देते. त्यामुळे लाभार्थीसंख्या वाढत आहे. माझ्या शेतीला सिंचन व्यवस्था नसल्याने तीन वर्षांपासून रोहयोंतर्गत विहिरींसाठी सर्व कागदपत्रे जमा करून ग्रामपंचायतीकडे सादर केली. त्यासाठी अपूर्ण कागदपत्रांचे कारण दिले जात आहे. पं.स. विक्रमगड येथे जाऊन अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांत अनेक वेळा विचारणा केली. जि.प. पालघर येथे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्याचे सांगण्यात आल्याचे ओंदे येथील शेतकरी बबन सांबरे यांनी सांगितले.
रोहयोंतर्गत विक्रमगड तालुक्यातील ३० सिंचन विहिरींचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवले होते. ३४ प्रकारची कागदपत्रांची पूर्तता नसल्याने हे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते पुन्हा आमच्या कार्यालयाकडे आले. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत. वरिष्ठ कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतरच तालुक्यात रोहयोंतर्गत सिंचन विहिरींची कामे सुरू होऊ शकतील.- बाबासाहेब गायकवाड, प्रकल्प अधिकारी, रोहयो,पंचायत समिती, विक्रमगड
n अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतात. रब्बी हंगामात त्यांना त्यातून राेजगार उपलब्ध हाेताे. n त्यामुळे अनेक शेतकरी सिंचन याेजनेतील विहिरींसाठी अर्ज करत आहेत.