- वसंत भोईर, वाडावाडा तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या असनस या गावासाठी लघुपाटबंधारे विभागाकडून एक मोठा तलाव (डॅम) व तीन किमी अंतरापर्यंत कालव्याचे काम मंजूर झाले होते. त्यासाठी एकूण १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, कालव्यासाठी शेतकरी जागा देत नसल्याने हे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. रखडलेल्या कामाकडे लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.लघुपाटबंधारे विभागाकडून या कालव्याचे बांधकाम सुरू करण्याअगोदर कालव्याच्या जागेचे संपादन करावयास हवे होते. मात्र, तसे न केल्याने आता शेतकऱ्यांनी जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे शासनाचे सुमारे ११ कोटी रु. पाण्यात गेले आहेत. असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.ज्या एक किमी अंतरापर्यंत कालव्याचे बांधकाम झाले आहे, तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून कालव्याला लिकेज असल्याने पाणी इतरत्र जात आहे. आता त्यावर लिकेज काढून पॅच मारण्याचा प्रयत्न ठेकेदार करीत असला तरी तो फोल ठरताना दिसून येत आहे. या कामावर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी केव्हा काम करीत होते, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत. यासंदर्भात स्थानिक शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शैलेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कालव्याचे बांधकाम चालू करण्याअगोदर जमीन संपादित केली असती तर आता जागेचा प्रश्न उद्भवला नसता व कालव्याचे काम रखडले नसते, अशी माहिती त्यांनी दिली. लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज.स. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता शासनाचे जमीन संपादनासंदर्भात नवीन धोरण जाहीर झाल्यास तत्काळ यासंदर्भात निर्णय घेता येईल व रखडलेले काम पूर्ण करता येईल, असे सांगून मी आताच येथील पदभार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लघुपाटबंधारे विभागाच्या निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे हे काम रखडले असून तसेच निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी केली आहे.आतापर्यंतचा लेखाजोखा...१असनस हा दुर्गम भाग असून येथील बहुतांशी नागरिक हे शेती करतात. उन्हाळ्यातही त्यांना भाजीपाला व भातशेती करता यावी, यासाठी राज्य शासनाच्या लघुपाटबंधारे विभागाकडून ७५ हेक्टर अशा विस्तीर्ण क्षेत्रात एक मोठा तलाव (डॅम) खोदण्यात आला आहे. २००६ साली या तलावाच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, कृष्णा भगवान रेड्डी यांच्या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. त्यासाठी अकरा कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आला. सदरचे काम २००९ साली पूर्ण करण्यात आले.२त्यानंतर, लघुपाटबंधारे विभागाने २०१० मध्ये तीन किमी अंतराच्या कालव्याला मंजुरी दिली. त्यासाठी ३ कोटी रु.चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या तलावामुळे सुमारे १२४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कालव्याचे काम सन २०१२ पर्यंत पूर्ण करण्याची अट आदेशात घालण्यात आली होती. कालव्याच्या एक किमी अंतरापर्यंतचे कामसुद्धा करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित कालव्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून बंदच आहे. येथील स्थानिक काही शेतकरी कालव्यासाठी जागा देत नसल्याने कालव्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.
असनस लघुपाटबंधारे योजना बासनात ?
By admin | Published: October 24, 2015 11:24 PM