(मंगेश कराळे)नालासोपारा: श्रद्धा हत्याकांड उलगडा झाल्यानंतर त्या गुन्ह्याच्या तपासासाठी आलेले दिल्ली पोलीस माणिकपूर पोलिसांच्या मदतीने गुन्ह्यासंदर्भात काही पुरावे मिळवण्यासाठी धडपड करत आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून मित्र मैत्रीणी, डॉक्टर, वडील, घरमालक, सोसायटी पदाधिकारी यांचे जाब जवाब घेण्यात आले आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब तिचा मोबाईल वापरत होता. आरोपी आफताबने या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी श्रद्धाचा मोबाइल व काही पुरावे भाईंदरच्या खाडीत फेकल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे.
त्यामुळे गुरुवारी दोन बोटींच्या सहाय्याने दिल्ली पोलिस माणिकपूर पोलिसांच्या मदतीने भाईंदरच्या खाडी ढवळून काढणार आहेत. या आधीही पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी भाईंदरची खाडी ढवळून काढली होती. आता दिल्ली व माणिकपूर पोलिसांना काही पुरावा मिळतो का याकडे समस्त पोलिसांसह वसईकरांचे लक्ष लागून आहे.