अंबरनाथ : सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे.कल्याण रेल्वे स्थानकात वाफेवर चालणाºया इंजिनांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी ग्रेट इंडियन पॅनसूल (जीआयपी) या कंपनीने मलंगगडाच्या पायथ्याशी काकाळेजवळ १९१० मध्ये धरण बांधले.या धरणातून नियमित कल्याणला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, नंतरच्या काळात डिझेलवर इंजीन आल्यावर या धरणातील पाण्याचा वापर कमी झाला.१९९७ पर्यंत कल्याण रेल्वे स्थानकात यातून पाणीपुरवठा होत होता. मात्र, नंतर कल्याण रेल्वे स्थानकातही पाण्याचे दुसरे स्रोत निर्माण झाल्यावर या धरणातील पाणी तसेच पडून राहिले. जीआयपी टँक हे वालधुनी नदीपात्रात बांधण्यात आले आहे. कित्येक वर्षे या धरणाचा वापर होत नसल्याने येथील व्हॉल्व्ह यंत्रणाही बिघडली आहे. हे पाणी पडून राहिल्याने रेल्वेने या पाण्याचा वापर करून मिनरल वॉटरचा रेल नीर प्रकल्प उभारला. रेल नीर प्रकल्प चालवणाºया कंपनीला हे पाणी ४० पैसे प्रतिलीटर या दराने विकण्यात येते. या धरणातून रेल्वेला आर्थिक लाभ होत असतानाही रेल्वेने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र कोणताही खर्च केलेला नाही. आज या धरणाची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडे पूर्णत: तुटले आहेत. अनेक ठिकाणी धरणाला गळती लागली आहे. भिंतीवर वड आणि पिंपळाचे वृक्ष मोठे होत आहेत. या वृक्षांमुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. चार ते पाच वर्षांपासून या धरणावरील वृक्षांची छाटणीदेखील केलेली नाही. त्यामुळे हे धरण आता रेल्वेसाठी फायद्याचे ठरत असले, तरी नागरिकांसाठी धोकादायक ठरणारे आहे. त्यामुळे आता या वृक्षांबाबत काही ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.जीआयपी टँकच्या पाण्याचा वापर मिनरल वॉटरसाठी रेल्वे प्रशासन करत आहे. या पाण्यावर नफा देणारा प्रकल्प उभा असल्याने त्याच्या देखभालीची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती आणि धरणावर आलेले वड-पिंपळाचे वृक्ष छाटण्याची गरज आहे.- सदाशिव पाटील, माजी बांधकाम सभापती
जीआयपी धरणाला झाडांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 1:28 AM