- अजय महाडिक
ठाणे: नालासोपारा-उमराळे येथील जैमुनी पतपेढीत झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पालघर आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी जयवंत नाईक-फुलारे याला बुधवारी वसई माणिकपूर-सनिसटी येथून अटक केली आहे. त्याला २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पालघर आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली.
जयवंत नाईक-फुलारे याच्या सांगण्यावरूनच जैमुनी पतपेढीतील संचालक मंडळाने मेसर्स साई एम्पायरचे बांधकाम व्यावसायिक अविनाश ढोले यांना बोगस ग्राहक उभे करून कर्जवाटप केले होते. या प्रकरणी सुनीता जयदेव तेजलानी आणि सोहेल मिठाणी यांनी तक्रार केल्यानंतर अविनाश ढोले, पतपेढीचे संचालक आणि सभासद अशा २८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. चौकशीअंती जयवंत नाईक-फुलारे याचेच नाव समोर आले होते. त्यानुसार पालघर आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी राजकीय दबाव झुगारून फुलारे याला अटक केली. त्याने जैमुनी पतपेढीतून मिळवलेले ३२ कोटी रु पये वेगवेगळ्या प्रकल्पांत गुंतवले होते. आर्थिक गुन्हे शाखेने ही संपत्ती संरक्षित केली असल्याची माहितीही पोलिसांंनी दिली. नालासोपारा-उमराळे येथील जैमुनी पतपेढी सामवेदी ब्राम्हण समाजाचा मानबिंदू मानली जाते, मात्र या गैरव्यवहारामुळे पतपेढीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली आहे.उपनिबंधक कार्यालयाकडूनही चौकशीचे आदेश!नालासोपारा-उमराळे जैमुनी पतपेढीत झालेल्या ३२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा लेखापरीक्षण अहवाल मागील महिन्यात वसई उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्यातून अनियमतिता स्पष्ट झाल्याने उपनिबंधक कार्यालयाकडून तिच्या चौकशीचे आदेश जारी केले होते. उपनिबंधकांकडून ही चौकशी होणार असल्याची माहिती वसई उपनिबंधक कार्यालयाने दिली.कोण आहेत ढोले?मेसर्स साई एम्पायरचे अविनाश ढोले यांनी विरार ग्लोबल सिटीतही दोन इमारतींचे बांधकाम केले आहे. यातील काही फ्लॅट त्यांनी प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांना विकले होते. यासाठी त्यांनी त्यांच्याकडून ३९ लाख रु पये घेतले होते; मात्र हेच फ्लॅट नंतर त्यांनी अन्य काही जणांना विकले होते. यात पौडवाल यांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत त्यांनी अर्नाळा पोलीस ठाण्यात तक्र ार दिल्यानंतर पोलिसांनी ढोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला वसई महामार्गावरील शेल्टर हॉटेलमधून ताब्यात घेतले होते.कसा झाला पाठपुरावा?मेसर्स साई एम्पायरचे बांधकाम व्यावसायिक अविनाश ढोले यांनी विरार येथील डोंगरी गावात १४ मजल्यांची भव्या हाईट्स आणि साई एम्पायर या इमारती बांधल्या आहेत. यातील एक फ्लॅट (नं. ३०५, क्षेत्र ४१६.७०) त्यांनी सुनीता जयदेव तेजलानी यांना विकला होता. करारनाम्यानंतर त्यासाठी तेजलानी यांनी गृह फायनान्सकडून कर्ज घेतलेले आहे. ढोले, त्याचा सहकारी रणजीत गोमाणे आणि इतरांनी याच फ्लॅटची बनावट कागदपत्रे जया पुंजा नायडा यांच्या नावे बनवून त्याद्वारे जैमुनी पतपेढीत गहाणखत केले होते व त्यांच्या नावे पतपेढीतून २२ लाखाचे कर्ज घेतले होते. यासाठी नायडा अथवा तेजलानी यांची संमती ढोले यांनी घेतली नव्हती. अशाचप्रकारे इतर ग्राहकांचीही फसवणूक केली.काय आहे प्रकरण?जैमुनी पतपेढीतून बोगस फ्लॅटधारकांच्या नावे मेसर्स साई एम्पायरचे बांधकाम व्यावसायिक अविनाश ढोले यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जवाटप गैरव्यवहारात संचालक मंडळाचाही सहभाग होता. त्याने सर्च रिपोर्ट सादर न करताच हे कर्जवाटप केले होते. यासाठी फ्लॅटधारकांच्या जागी बोगस ग्राहकांच्या कोट्यवधींचे कर्ज ढोले यांना देण्यात आले. काही प्रतिष्ठितांकडून हे परस्पर मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तक्र ारदारांच्या पाठपुराव्यामुळे बिंग फुटले.