पारोळ: चिमाजी आप्पांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणाऱ्या वसईच्या जंजिरा किल्ल्याचा भुईदरवाजा व सागरी दरवाजा यांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यांचे तातडीने संवर्धन करण्याची तीव्र गरज आहे. प्रत्यक्ष पाहणी व छायाचित्रांच्या आधारे भुईदरवाज्याच्या वरील अंगास तडा असणाऱ्या कमानीचा मुख्य दगड कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. तर कमानीवर उगवलेल्या झाडांच्या मुळांनी मध्य कमानीपासून भेगा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे मध्य कमानीच्या कोसळण्याच्या स्थितीतील दगड निखळला तर वरच्या तटबंदीवरील बराचसा भाग कोसळण्याची प्रक्रिया सुरु होऊन इतिहासाच्या साक्षीचा एक दुवाच निखळून पडेल. पोर्तुगीज व मराठे अशा मिश्र शैलीतून तयार झालेले हे बांधकाम पुनश्च उभारणे कठीण आहे. पुरातत्व विभागाने यासाठी त्वरित पावले उचलावीत म्हणून गेल्या १४ फेब्रुवारीपासून किल्ले वसई मोहीम सतत पाठपुरावा करत आहे. सध्या किल्ल्यातील बऱ्याचशा वास्तूंचे संवर्धन काम पुरातत्व विभागाकडून समाधानकारक चालले आहे मात्र भुईदरवाजांच्या संवर्धनाचे काम अत्यावश्यक कामात घेणे गरजेचे आहे. वसई किल्ल्याच्या वैभवाचे प्रत्यक्ष दर्शन जेथून सुरु होते त्या भुवई दरवाजाची व सागरी दरवाजाची छबी आपल्या नजरेत, साठवून आपल्या पूर्वजांच्या पराक्र माला दुर्गप्रेमी प्रथम दर्शनी उजाळा देतो. त्याच भुईदरवाजाची स्थिती बिघडली तर? मात्र असे होता काम नये म्हणून पुरातत्व विभागाने येथे किंचितही दुर्लक्ष करू नये असे मत इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी मांडले आहे. तसेच किल्ल्यातील धोकादायक स्थितीतील वास्तू अथवा अवशेषांबद्दल पुरातत्व विभागाने दुर्गिमत्र व अभ्यासक यांच्या सोबत एक संपूर्ण दिवस जतनीकरणाचा मागोवा नमूद करणारी मोहीम राबवल्यास किमान आवश्यक घटकांची यादी तयार होण्यास मदत होईल, असे सांगितले.याबाबत किल्ले वसई मोहीम परिवाराने फेब्रुवारी २०१७ पासून संवर्धन मोहीम अंतर्गत या वास्तूंचे आराखडे व सध्याची परिस्थिती यांची प्रत्यक्ष पाहणी करून यादी तयार करण्याचे काम सुरु केले आहे. (वार्ताहर)
वसईच्या जंजिरा किल्ल्याला गेलेत मोठे तडे
By admin | Published: February 24, 2017 6:44 AM