विक्रमगड : तालुक्यातील जव्हार अर्बन बँकेचा विस्तार वाढावा, यासाठी कासा येथे शाखेने पिग्मी एजंट नेमला. दररोज हा एजंट कलेक्शन करून बँकेत पैसे जमा करत होता. खातेदारांनी त्याच्यावर एवढा भरवसा ठेवला की, तोच पैशांचे व्यवहार करू लागला. याचा फायदा घेऊन त्याने कासा येथील मैनुद्दीन रहीम खान, माधव दशरथ पाटील, संजय निवृत्ती धवहार यांची खोटी कर्ज प्रकरणे बनवून ५० हजार रुपयांचे कर्ज काढले. परंतु, प्रत्यक्षात हे कर्ज घेतलेच नाही, असा आरोप या तिन्हीही उपोषणकर्त्यांनी केला आहे. याबाबत अनेक वेळा बँकेशी बोलणे झाले असून संबंधित काहीच हालचाल करीत नसल्याने हे उपोषण करत असल्याचे सांगितले. पिग्मी एजंट सचिन निर्भवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच न घेतलेले कर्जही रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली असून बँक कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाही. याबाबत या तीनही उपोषणकर्त्यांनी पिग्मी एजंट सचिन निर्भवणेवर पोलिसांत तक्रार केली आहे, परंतु पोलीस व बँक कारवाई करीत नसल्याने हे उपोषण सुरू आहे. (वार्ताहर)
जव्हार अर्बनच्या पिग्मी एजंटाने घेतले नकली दस्ताद्वारे कर्ज
By admin | Published: August 10, 2015 11:34 PM