जव्हार : जव्हार तालुक्यातील देहरे ग्रामपंचायत हद्दीतील कडव्याची माळ येथे मंगळवारी मंगला दिलीप वाघ हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची हत्या करून स्वत:ही फाशी घेतल्याची घटना घडली होती. ही घटना भूकबळीतून घडल्याची चर्चा होती. मात्र आता यामागे भूकबळीचे कारण नसल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या आत्महत्येचे राजकारण करू नये. हा भूकबळीचा प्रकार नसल्याचे आमदार सुनील भुसारा यांनी म्हटले आहे.आमदार भुसारा यांनी घटनास्थळाची पाहणी करून या महिलेच्या पतीशीही बातचीत केली. त्यांच्यासोबत यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश सांबरे, बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी, उपसरपंच संदीप माळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मृत महिलेचे पती दिलीप यांनी सांगितले की, घरात अन्नधान्य पुरेसे आहे. गरिबी किंवा भूकबळी हे पत्नीच्या आत्महत्येमागचे कारण नाही. खायला नाही म्हणून कुणी आत्महत्या करेल अशी स्थिती गावात नाही. स्वस्त धान्य दुकानदारही पैसे नसेल तर उधार धान्य देत असल्याचे दिलीप यांनी सांगितले.महिलेच्या पतीची भेट घेतल्यानंतर आ. भुसारा म्हणाले की, या आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे कुणीही राजकारण करू नये. आत्महत्येला भूकबळीचे स्वरूप देऊ नये. गरिबीला कंटाळून महिलेने आत्महत्या केल्याचा उल्लेख फिर्यादीत नसल्याचे उपसरपंच गवळी यांनीही सांगितले.>मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारलीपीडित कुटुंबाला काही वस्तंूची यावेळी मदत करण्यात आली. याशिवाय, रोख रक्कमही मदत म्हणून देण्यात आली. मृत महिलेला सात वर्षांची मुलगी असून तिच्या शिक्षणाची जबाबदारी यावेळी भुसारा यांनी घेतली. सरकार पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी सांबरे यांनी दिली.
जव्हारची ‘ती’ घटना भूकबळीची नाही; आदिवासी महिलेच्या आत्महत्येचे राजकारण नको- सुनील भुसारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 12:15 AM