- हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील बाजारपेठेत खते, बियाणे, किटकनाशके यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी झुंबड उडाली आहे. जव्हार तालुक्यातील शेतकतकरी भाताचे बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपूनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात, हे बियाणे खरेदी करतात, तर मसुरा, कसबय, सुमा, एक काडी, कोलम, हे बियाणे गरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा हा लवकर पिकणारा भात आहे, तो १०० ते १२० दिवसांत पिकतो, आणि गरवा भात १४५ ते १७० दिवसांत पिकतो, त्यामुळे हळवा भात बियाणांना चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ८० ते १५० पर्यंत, तर गरवा भाताचे २५ किलो बियाणे, ९५ ते १८० या दराने उपलब्ध आहे.याच बरोबर प्रामुख्याने याभागात नागलीचे पिक मोठ्याप्रमाणात शेतकरी घेतात. येथील आदिवासी बांधव हे झालेले पिक बहुतांशी आपल्या कुटुंबासाठी वापरतात व थोडयाफार पिकाचीच विक्री करतात. तसेच वरईच्या बियाणांनाही मोठी मागणी आहे. या पिकाला चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आप आपल्या ऐपतीनुसार जागेच्या उपलब्धतेनुसार पिक घेतात, वरईला येथील जमीन उपयुक्त असल्यामुळे पिकही चांगले येते, तसेच वरई पासूनच भगर तयार करण्यात येते, तिला जास्त मागणी असल्यामुळे, भावही चांगला मिळत असल्यामुळे, येथील शेतकऱ्यांसाठी तो उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरला आहे. प्रत्येक पिक घेण्यासाठी विविध प्रकारची खते व औषधे शेतकऱ्यांना लागत असतात, पावसाळा जवळ आला की, त्याची खरेदी सुरू होते. परंतु मागणी एकदम वाढल्यामुळे भाव वाढ होते, त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे. वातावरणाचा अंदाज पाहता नियमित पाऊस पडेल अशा आशेवर शेतकरी या खरेदीसाठी बाजारात झुंबड करीत आहेत. असे जाणकारांचे म्हणणे आहे.