हुसेन मेमन / जव्हारनगर परिषदेच्या पाच प्रभागांची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असली तरी, पालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या सहा महिन्यानंतर होणार असल्यामुळे या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बुधवारी शासकिय विश्रामगृह येथे याबाबतची बैठक झाली. यावेळी पालघर जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष सुनिल भुसारा, नगराध्यक्ष संदीप वैद्य माजी नगराध्यक्ष दिनेश भट व रियाज मनियार, बहुजन विकास आघाडीचे दत्तू घेगड, राष्ट्रवासीचे विक्रमगह विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दिलीप तेंडुलकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष भरत सोनार, आय कॉग्रेसचे संदीप मुकणे, फारूक मुल्ला, राजेश धात्रक, चित्रांगण घोलप, दीपक कांगणे आदी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. जव्हार नगर परिषदेच्या पाच नगरसेवकांना पक्षांतर कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले व त्यामुळे या पाच प्रभागांची पोटनिवडणूक घोषित झाली. मात्र हे नगरसेवक का फुटले ? कोणी फोडले ? आणि इतका मोठा निर्णय या नगरसेवकांनी का घेतला ? त्यांच्या पाठीशी कोण होते ? असे अनेक प्रश्न त्यावेळी गुलदस्त्यात होते. तसेच कट्ट्यावरील चर्चेत ही सर्व खेळी विरोधी पक्षांची असावी असेही बोलले जात होते, मात्र हे कोणामुळे घडले आणि आज जव्हार नगर परिषदेच्या विकासाला गेल्या दोन वर्षापासुन खीळ बसली त्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.जव्हार नगर परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीने एकूण १७ पैकी १४ जागा मिळवून सत्ता प्राप्त केली होती. मात्र दोन वर्षाताच एकूण १० नगरसेवकांनी बंडखोरीकरून एक वेगळा गट स्थापन करून सत्ताधाऱ्यांना हादरा दिला, मात्र यातील ८० टक्के नगरसेवक हे प्रथम निवडून आले होते, त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय कसा घेतला ? त्यांचा पाठीराखा कोण ? अशी चर्चा जव्हारकरांमध्ये होती. हा गट बेकायदेशीर ठरवून त्यातील १० नगरसेवकांना अपात्र घोषीत करण्यात आले होते.
जव्हारच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार?
By admin | Published: April 26, 2017 11:31 PM