जव्हार : गाव तिथे रस्ता व गाव तिथे एसटी ही शासनाची संकल्पना खोटी ठरत आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भाग व गुजरात, दादरानगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशाच्या सरहद्दीवर असलेल्या वावर- वांगणीतील दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात सुरु असलेली बस बंद आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. त्यांनी ही बस चालू ठेवण्याची मागणी डेपोकडेकेली आहे. जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी, बेहेडपाडा, चौकीपाडा, सरोळी, चीकाडीपाडा, सावरीचाघरटा, असे १५ गाव-पाडे या परिसरात असून, त्यांची लोकसंख्या १० हजाराच्या आसपास तर त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील मुलवढ, ओझरखेड, ब्राम्हणपाडा, अशा ग्रामपंचायती लागून आहेत. त्यामुळे या भागातून एसटी बसने प्रवास करणारे शेकडो प्रवासी आहेत. मात्र पावसाळा संपल्यानंतर सुरू होणारी जव्हार ते वावर-वांगणी ही जून महिन्यांपर्यंत चालू राहणारी बस या वर्षी जानेवारी महिना संपून फेब्रुवारी महिना आला तरीही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. बस सुरू करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा बस चालू करण्याची मागणी केली आहे. मात्र जव्हार एसटी महामंडळाने रस्ता खराब असल्याचे कारण सांगितले आहे. वावर-वांगणी हे जव्हार तालुक्यापासून ३५ कि.मी. असल्याने तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी खाजगी जीपचा आधार घ्यावा लागत आहे. नाहीतर नाईलाजाने तालुक्यात असलेली कामे पुढे ढकलावी लागत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. (प्रतिनिधी)
जव्हार वावर- वांगणी गावात एसटी सुरु करा!
By admin | Published: February 03, 2016 2:03 AM