विक्रमगड - २० जुलै रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांसाठी घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात हृदयविकार असल्याचे निष्पन्न झालेल्या भिवंडी तालुक्यातील कवाड येथील दीड वर्षाच्या सांज जयदिप घरत या मुलीच्या हृदयावर अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया ९ आॅगस्ट रोजी एस.आर.सी.सी.चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, येथे मोफत करण्यात आली.मुलीचे कुटुंब अतिशय गरीब असून ती हृदयविकाराने त्रस्त होती.तिच्यावर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे १७५००० रुपये होता. तो करणे तिच्या पालकांना शक्य नव्हते. परंतु जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था झडपोलीचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आयोजित केलेल्या शिबिराची माहिती पालकांना मिळाली व ते तिला शिबिरात घेऊन आले त्यामुळे त्यांच्या मुलीचा उपचार पूर्णपणे मोफत झाला. ठाणे व पालघर जिल्ह्यातील एकही गरीब उपचार व शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सतत कार्यरत आहे. ह्याच शिबिरातील एकूण १५१ लहान मुलांवर विविध शस्त्रक्रि या एस आर सी सी व वाडीया हॉस्पीटल येथे मोफत स्वरूपात होणार आहे. सांजच्या मातापित्यांनी या संस्थेला व तिचे सूत्रधार निलेश सांबरे यांना धन्यवाद दिले आहेत.आमची मुलगी हृदयविकाराने त्रस्त होती तिच्या वेदना आम्हाला बघत नव्हत्या डॉक्टरांना दाखविल्यानंतर तीच आॅपरेशन करावे लागेल असे सांगितले त्यासाठी खूप खर्च येणार होता आमची परिस्थिति बिकट असल्याने तो आम्हाला झेपणार नव्हता आम्हाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या आरोग्य शिबिराची माहिती मिळाली. त्यात सांज ची तपासणी केल्यानंतर एस.आर.सी.सी.चिल्ड्रन्स हॉस्पिटल मुंबई, येथे ती मोफत झाली.- भाग्यश्री घरत, सांजची आईजिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुंबईने मुलांकरिता मोफत महा आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते त्यात सांज जयदिप घरत ही दीड वर्षाची मुलगी हृदयविकाराने त्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. तिची परिस्थिति बिकट असल्याने या शस्त्रक्रि येचा संपूर्ण खर्च आमच्या संस्थेने केला. याबाबत मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचे विशेष सहकार्य लाभले. या पुढे सांजसाठी करावा लागणारा सर्व खर्च आमची संस्था करणार आहे. त्याचप्रमाणे या शिबिरात ज्या ज्या बालकांवर शस्त्रक्रिया करावी लागेल असे निष्पन्न झाले. त्या शस्त्रक्रियांचा खर्चही आमची संस्था करणार आहे.- निलेश सांबरे, संस्थापक, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेने दीड वर्षाच्या सांजला दिले नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 2:38 AM