वसई - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीं एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे, असे वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ आज बुधवारी वसईत प्रविण दरेकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टी वसई विरार जिल्हा यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा अश्विनी गुरव यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गुरव म्हणाल्या की, “ मंगळवारी एका कार्यक्रमात महिलांबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी जे विधान केले आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही वसई विरारमध्ये दरेकर यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करून या वक्तव्याचा निषेध करत आहोत अशा शब्दात त्यांनी दरेकर यांच्यावर निशाणा साधला.
या आंदोलनात यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष विद्या सरनाईक, युवती अध्यक्ष करिष्मा शहा खामकर,एलिसा परमार जिल्हा उपाध्यक्ष, कुसुम देवी गोड जिल्हा सरचिटणीस, मनिषा विश्वकर्मा वसई उपाध्यक्ष, विद्या नेवासे वसई सदस्य,रेखा शिरसवल, जिल्हा सदस्य लक्ष्मी राजभर, पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.