पारोळ : जर सरकारला पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा पास करायचा नसेल तर झालेल्या हल्ल्यांचे गुन्हे दाखल करून पोलिसांचा वेळ वाया घालविण्यापेक्षा पत्रकारांना मारहाण करणाऱ्यांना तरी संरक्षण देणारा कायदा पास करा, या मागणीसाठी दी प्रेस क्लब आॅफ वसई-विरार या संघटनेतर्फे आझाद मैदानावर बनियान धरणे आंदोलन करण्यात आले.पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा पास करण्यासंबंधी कोणताही राजकीय पक्ष उत्सुक नाही, ना सरकार. त्यामुळे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असून पत्रकारांची हत्या करण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली.वसई परिसरातसुद्धा पत्रकारांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. सातिवली परिसरात मी मराठी न्यूज वाहिनीचे कॅमेरामन संदीप लोखंडे यांना मारहाण झाली होती. तसेच, त्यांच्या कॅमेरा व मोबाइलचीही समाजकंटकांनी तोडफोड केली होती. तसेच मीरा-भार्इंदर येथे वार्ता संकलनासाठी गेलेल्या दोन पत्रकारांना डांबून ठेवून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पण, आजमितीला पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा पास करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष वा सरकार धैर्य दाखविताना दिसत नसल्यामुळे आझाद मैदानावर बनियान आंदोलन वसईच्या पत्रकारांनी केले. यावेळी जमलेल्या पत्रकारांनी घोषणाबाजी करुन धोरणाचा निषेध केला.
पत्रकारांचे आझाद मैदानावर आंदोलन
By admin | Published: July 25, 2015 4:02 AM