राहुल वाडेकर । विक्रमगड : कंपनीत कामावर असतांना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे कामगाराच्या अंगावर अॅसिड पडून तो गंभीररीत्या जखमी झाल्याची घडली आहे. यामधुन तो कामगार सुदैवाने बचावला असून त्याच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. रविवारी या घटनेस दोन आठवड्याचा कालावधी लोटला अतानाही कंपनी व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिस व प्रशासनापासून दडवुन ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार देखील येथे उघडकीस आला आहे. त्यामुळे या कंपनीची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेलपाडा वासियांनी केली आहे. तुषार ढोणे (२७) असे या अॅसिड आंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून तो विक्र मगड तालुक्यातील शेलपाडा येथील रहिवासी आहे. तालुक्यातील आलोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेली इस्टिम इंडस्ट्रीज प्रा.ली ही केमिकल कंपनी असून दि.१७ जुलै २०१७ रोजी तुषार रात्रपाळीला असताना रात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या प्लांटमध्ये असिडचे नमूने घेतांना तो पाईपचा वॉल्व उघडण्यास गेला असता तो पुर्ण निघाला त्यात तो पडल्याने त्याचे हात व पाय भाजून त्यास गंभीर जखमा झाल्या आहेत.अपघातानंतर त्यास वाडा येथील खाजगी रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, जखमा जास्त असल्याने त्यास पुढील उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे. बाईसरच्या खाजगी रुग्णालयाकडून या प्रकरणी तात्काळ बोईसर पोलिस स्टेशनला कळविण्यात आले. त्यानंतर पोलिस जबाबासाठी रुग्णालयात येथे गेले परंतु घडलेल्या प्रकरणाबाबत बोईसर पोलिस स्टेशन येथून नोंदीची खात्री करण्यासाठी संपर्क केला असता पालिसांकडून अद्याप पर्यंत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अपघाताबाबत इस्टिम कंपनीने पोलिस स्टेशनला माहिती न दिल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कामगार भाजल्याचा प्रकार १५ दिवस दडपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:20 AM